• आत्ताआत्ताची गोष्ट आहे ती.. कुठला तरी अलियाचा चित्रपट चांगला चालला आहे म्हणे, कित्येकदा पाहायचंय असं मनाशी ठरवत ठरवत जवळपासच्या चित्रपटगृहांच्या जाहिराती धुंडाळून पाहिल्या. आपल्या कामाच्या वेळा, चित्रपटाची एकूण लांबी आणि आपल्या घरी परतण्याच्या प्रवासाचं तासांचं गणित, कुठल्या चित्रपटगृहात किती वाजताचा शो पाहणं आपल्याला सोईचं आणि वेळेचं आहे अशी सगळी गणितं बांधूनही मला चित्रपटगृहात पोहोचता येत नाही. हल्ली तर शुक्रवार ते शुक्रवार चित्रपटाची विकेट पडते त्यामुळे राहूनच गेला तो.. आता मोबाइलवर नाही तर टीव्हीवर येईल तेव्हा पाहायला हवा..
  • प्रसंग दुसरा.. रेल्वेस्थानकांवर फ्री वाय-फाय मिळतं आहे म्हणून तिथेच उभे राहणाऱ्या मुला-मुलींचे घोळके..
  • प्रसंग तिसरा.. रेल्वेतला तासाभराचा प्रवास बाजूच्याच्या मोबाइलवरून झटकन चित्रपट ‘शेअर इट’ करून आपल्या मोबाइलवर पाहून घ्यायचा..
  • आणि आता प्रसंग चौथा.. जो पुन्हा एकदा मुंबईकरांच्या अनुभवविश्वात प्रवेश करता होणार आहे. तो म्हणजे आपली गाडी पार्क करायची आणि गाडीत बसूनच मजेने खात-पीत, बाहेरच्या मोकळ्या हवेत समोरच्या मोठाल्या स्क्रीनवरचा चित्रपट पाहायचा.

या सगळ्या प्रसंगांमध्ये चित्रपट पाहायचा म्हटल्यावर तिकीट काढून चित्रपटगृहांमध्ये शिरायचं. अंधाऱ्या वातावरणात आपल्या वाटय़ाला आलेल्या क्रमांकाच्या सरळसोट खुर्चीवर बसून चित्रपट पाहायचा हा प्रसंग आता एका पिढीच्या स्मरणरंजनाच्या यादीत जमा करण्याइतका जुना होत चालला आहे. डिजिटायझेशनच्या वेगात जेव्हा वाटेल तेव्हा, जिथे वाटेल तिथे आणि जे सोयीचे माध्यम पडेल त्या माध्यमाच्या मदतीने नवेकोरे चित्रपट बघणे हे सहजसाध्य झाले आहे. या दृक् -श्राव्य माध्यमाची जादूच इतकी निरंतर आहे की जळी, स्थळी, काष्ठी-पाषाणी जिथे म्हणाल तिथे चित्रपट पाहणं आणि दाखवणं ही कमाल दोन्ही बाजूंना साधली आहे. एवढंच नाही तर या जादूई करामतीतून अर्थविश्वाची घोडदौडही तितक्याच वेगाने होते आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात एकेकाळी बंद झालेले ‘ड्राइव्ह इन थिएटर’ नव्या डौलात, नव्या संकल्पनांसह उभं राहणार आहे. या बातमीने सिनेशौकीन कमालीचे सुखावले आहेत. म्हणजे ज्या काळात तुमची घरातील इडियट बॉक्सवरची ‘एचडी’ मनोरंजन वाहिनी पाहणं हे प्रतिष्ठेचं बनू लागलं आहे. तिथे जर एक कुतूहल म्हणून का होईना मोकळ्या हवेत, आपल्याच पार्क केलेल्या गाडीत बसून एका मोठय़ा स्क्रीनवर हवा तो चित्रपट पाहायला मिळत असेल तर त्याचा अनुभव घ्यावा असं वाटणं साहजिक आहे. मग कोणाला बंद गाडीत चित्रपट नसेल पाहायचा तर त्याला पर्याय म्हणून त्याच जागेत एक कॅफे असेल जिथे बसूनही चवीने खाता-पिता तुम्हाला तोच चित्रपट पाहण्याची सोय आहे. ‘ड्राइव्ह इन थिएटर’सारखी संकल्पना आज आपल्याला तंत्रज्ञानाच्या करामतीमुळे शक्य झाली आहे, असं ‘सोसायटी ऑफ मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इंजिनीअर्स’ या संस्थेचे भारतीय विभागाचे अध्यक्ष उज्ज्वल निरगुडकर यांनी सांगितलं. चित्रपटाच्या प्रोजेक्शन तंत्रामध्ये लक्षणीय बदल झाला आहे. पूर्वी मोक ळ्या वातावरणात स्क्रीन उभारल्यानंतर सूर्याची किरणे त्यावर परावर्तित होत असल्याने प्रिंट चांगली दिसत नव्हती. आत्ता प्रिंट्सही डिजिटल झाल्या आहेत. सूर्यप्रकाशाचा परिणाम स्क्रीनवर होत नाही शिवाय स्क्रीनपासून लांब अंतरापर्यंत तुम्हाला चित्रपट चांगल्या पद्धतीने दिसतो. त्यामुळे ‘ड्राइव्ह इन थिएटर’ आता या घडीला आपल्याकडे चांगलेच लोकप्रिय ठरेल, असा विश्वास निरगुडकर यांनी व्यक्त केला. सध्या अहमदाबाद, चेन्नई अशा मोजक्याच ठिकाणी ‘ड्राइव्ह इन थिएटर्स’ आहेत. सिनेमा जसा आता मोकळ्या वातावरणात येऊ पाहतो आहे तसाच बंदिस्त सभागृहातील चित्रपट पाहण्याचा अनुभवही गेल्या काही वर्षांत बदलला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये चित्रपट पाहण्याच्या तंत्रातील बदलाबरोबरच त्याच्या भोवतालचे वातावरणही, त्यासाठी दिली जाणारी खान-पानाची सेवा यातही आमूलाग्र बदल घडणार आहेत.

‘सिनेमा एक्झिबिशन इंडस्ट्री’च्या सर्वेक्षणानुसार देशभरात पीव्हीआर, आयनॉक्स, कार्निव्हल सिनेमा, सिनेपोलीस असे मोजकेच मल्टिप्लेक्स समूह मक्तेदारी राखून आहेत. डिजिटायझेशनचा वाढता वेग आणि मोबाइलपर्यंत पोहोचलेला चित्रपट यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणणं हेच आमच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. भारतीय प्रेक्षक अजूनही चित्रपटाच्या बाबतीत तो कसा पाहता येईल, किती मजेने पाहता येईल, याचा प्राधान्याने विचार करतो, असं ‘कार्निव्हल सिनेमा’चे अध्यक्ष संजय दलिया यांनी सांगितले. त्यामुळे सध्या २ के प्रोजेक्शन, ४ डी तंत्रज्ञानाने अद्ययावत चित्रपटगृहे करण्यावर ‘कार्निव्हल सिनेमा’चा भर असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आयमॅक्स’ फॉर्मॅट किंवा डोममध्ये पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्येही येत्या काळात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र तंत्रज्ञानाबरोबरच भारतीय प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेऊन आसनव्यवस्था, खानपानाची व्यवस्था यात बदल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी फक्त लाकडी खुर्चीत बसून चित्रपट पाहिला जात होता, आता साध्या चित्रपटगृहांमध्येही १८० अंशांच्या कोनात मागेपुढे करता येतील अशा खुच्र्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत. लोकांना झोपून चित्रपट पाहता येण्याची सोय करून देणारे ‘लाऊंज थिएटर्स’ही लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. त्याचबरोबर पूर्वीचे चहा-कॉफी-समोसा-कोक हे बाद करून बिर्याणी, फेसाळती कॉफी यासह वेगवेगळे पर्याय बसल्या जागी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये केले जाणारे बदल हे आजच्या काळाची गरज आहे. पण तरीही लोकसंख्या आणि चित्रपटगृहांची संख्या यातले व्यस्ततेचे प्रमाण लक्षात घेतले तर ‘डायरेक्ट टू होम’ सव्‍‌र्हिस आणि ‘जियो’सारखे फोरजी तंत्रज्ञान लोकांच्या हाती सहज उपलब्ध झाल्यानंतर मोबाइल प्लॅटफॉर्मच चित्रपट पाहण्याच्या तंत्रात क्रांतिकारी ठरतील, असे निरगुडकर यांनी स्पष्ट केले. ‘जियो’ कंपनीने सहा हजार चित्रपटांसाठी करार केला आहे. ‘एअरटेल’नेही चित्रपट आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. सध्या देशभरात अडीच हजार मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे आहेत. २०१९ पर्यंत ही संख्या ३ हजारांच्या पलीकडे नेण्याचा इंडस्ट्रीचा विचार असल्याचे ‘सिनेमा एक्झिबिशन इंडस्ट्री’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पण मल्टिप्लेक्स वाढवण्याचा वेग हा सध्या ‘फोरजी’ तंत्रज्ञानामुळे मोबाइलवर चित्रपट पाहण्याचा वेग जितका वाढतो आहे त्यापेक्षा कमीच आहे. शिवाय, कमी किमतीत जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा हा फंडा चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याचे निरगुडकर यांनी सांगितले.

एका सेकंदात ४८ फ्रेम्स

अमेरिकेत २००४ पासून डिजिटायझेशनला वेगात सुरुवात झाली. भारतात २००८ पासून डिजिटायझेशन सुरू झाले. संपूर्ण देशभरात ११ हजार स्क्रीन्स आहेत ज्यापैकी ९० टक्के स्क्रीन्सची डिजिटायझेनशची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आपल्याकडे आणि परदेशातील सिनेमाच्या तंत्रज्ञानात जो मोठा फरक आहे तो प्रोजेक्शनमध्ये.. तिथे ४ के तंत्रज्ञान हे आता प्रमाणित तंत्रज्ञान आहे. आपल्याकडे अजून २ केचीही पूर्तता केली जात नाही. दुसरा एक मोठा बदल येऊ पाहतो आहे तो म्हणजे आत्तापर्यंत एका सेकंदाला २४ फ्रेम्स दिसतात हे गणित होतं. वर्षांनुर्वष याच वेगाने चित्रीकरण होतं आहे. मात्र ‘हॉबिट’ या चित्रपटाच्या निमित्ताने एका सेकंदात ४८ फ्रेम्स शूट झाल्या आहेत. अ‍ॅमस्टरडॅमला अँग लीच्या चित्रपटाचा डेमो दाखवण्यात आला ज्यात एका सेकंदात १२० फ्रेम्स शूट करण्यात आल्या आहेत. मात्र अशा पद्धतीचा चित्रपट पाहायचा तर त्यासाठी तुमच्या स्क्रीनचं प्रोजेक्शनही तितकंच दर्जेदार असायला हवं. शेवटी हे बदल पडद्यावर दिसणारी प्रतिमा किती ठळक, बारीकसारीक तपशिलांसह आणि त्याच रंगांमध्ये दिसते याच्याशी निगडित असल्याचं निरगुडकर यांनी सांगितलं. आपल्याकडे सध्या मल्टिप्लेक्समध्ये प्रोजेक्शनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमधली वाढती स्पर्धाही याला कारणीभूत ठरली आहे.

फोर डीचे तंत्रज्ञान ..

चित्रपट पाहताना पडद्यावर पाऊस पडत असला तर प्रत्यक्ष पाहणाऱ्यानेही चिंब भिजायचे, स्वित्र्झलडच्या फु लांच्या बागांमधून फिरताना त्या फुलांचा सुगंधही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे ‘४ डी’ तंत्रज्ञान मल्टिप्लेक्समधून आणले जात आहे. सध्या तरी असे चित्रपट थीमपार्कपुरतेच मर्यादित आहेत. ते सर्वसामान्यपणे चित्रपटगृहांमधून येण्यासाठी काही काळ लागेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.