flashback, ajay devgnआपण प्रामुख्याने चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी चित्रपटगृहात जातो ही सवयीची व परिचित गोष्ट. पण साठ सत्तरच्या दशकात चित्रपटगृहावरचे डेकोरेशनदेखिल पहाण्याचा जणू उपक्रम असे व त्यातही चित्रपट रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असे. इथे दिलेले छायाचित्र पाहिले तरी त्याची चांगलीच कल्पना येईल. ५ ऑगस्ट १९६० रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहात के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल-ए-आझम’ थाटात झळकला तेव्हाचे हे छायाचित्र आहे. म्हणजेच चित्रपटगृह पहाण्याचा आनंद वेगळा आणि चित्रपट पहाण्याचा वेगळाच. असा दुहेरी आनंद त्या दोन अडीच दशकातील रसिकांना मिळाला. गंमत म्हणजे चित्रपटाने २५ अथवा ५० आठवड्यांचा मुक्काम केला तरी चित्रपटाच्या स्वरुपानुसार थिएटरला केलेली सजावट कायम असे आणि हाऊस फुल्लमुळे तिकीटे मिळाली नाहीत तरी हे डेकोरेशन पाहूनही आनंद होई अथवा फक्त हे डेकोरेशन पहाण्यासाठीही चित्रपटगृहावर फेरफटका मारण्यात आनंद मिळे. मराठा मंदिर चित्रपटगृहात झळकलेल्या ‘गाईड’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘पाकिजा’, ‘खेल खेल में’, ‘ड्रीम गर्ल’, ‘रझिया सुल्तान’ तसेच नंतरच्या काळातील ‘धरमकाटा’, ‘रजपूत’, ‘शहेनशहा’, ‘अग्निपथ’ अशा चित्रपटांच्या वेळीही असेच देखणे डेकोरेशन पहायला मिळे. दक्षिण मुंबईतील मॅजेस्टिक (१९७२ ला बंद), ऑपेरा हाऊस (२० ऑक्टोबरला पुन्हा सुरु होतेय), इंपीरियल, मिनर्व्हा (शोले प्रसिद्ध…. आता पाडलयं) अशा चित्रपटगृहांची तर ही डेकोरेशन संस्कृती खास आकर्षण होते. आता कोणी म्हणेल चित्रपट पहावासा वाटणे समजू शकते, पण डेकोरेशन? हे तर भाबडेपण झाले. कोणी काही म्हणू देत, परंतु आपल्याकडील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीचा तो महत्त्वपूर्ण घटक होता…
दिलीप ठाकूर