‘नववर्ष स्वागत समिती’तर्फे गोरेगाव पूर्व येथे आयोजिण्यात आलेल्या स्वागत यात्रेतही ‘स्वच्छ भारत अभियान’ केंद्रस्थानी होते. त्याची सुरूवात गोरेगावकरांनी आदल्या दिवसापासूनच केली होती. ‘स्वच्छ गोरेगाव’चे उद्दिष्ट ठेवत आदल्या दिवशी येथील सर्व रस्ते आणि गल्लीबोळ झाडून स्वच्छ करण्यात आले. स्वच्छ रस्ते रांगोळ्यांनी नटविण्यात आले. यात गोरेगावकरांनी उत्फुर्त सहभाग घेतला. गुढीवाडव्याच्या दिवशी सकाळी पांडुरंग वाडी आणि वनराई कॉलनी येथून दोन वेगवेगळ्या शोभायात्रा निघाल्या. त्या दत्त मंदिर चौकात एकत्र आल्या. त्यानंतर पुढे पेरू बाग मार्गे येऊन जयप्रकाश नगर येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली.या शोभायात्रेत ध्वज पथक, ढोल पथक, झांज पथक, लेझिम पथके सहभागी झाली होती. यात साधारणपणे ८०० तरूण आणि ४५० महिलांनी सहभाग नोंदविलाा. या शिवाय जवळपास १२ ते १३ हजार गोरेगावकर या यात्रेत सहभागी झाले होते, असा दावा समितीचे दिनेश राजपूत यांनी केला. तलवार, झांज, ढोल यांची डोळ्याची पारणे फेडणारी प्रात्यक्षिके यावेळी पार पडली. या शिवाय विविध विषयांवरील देखाव्यांनीही पारंपरिक शोभायात्रेची शोभा वाढविली. सन्मित्र विद्या मंदिर आणि नूतन शिशु मंदिर या शाळेच्या मुलांनीही देखावे तयार केले होते. यावेळी जागतिक वन दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ‘सेव्ह ट्री’ या विषयावर देखावा तयार केला होता.
‘हिंदू नववर्ष स्वागत समिती’ने दहिसर पश्चिममध्ये आयोजित केलेल्या स्वागत यात्रेत मोठय़ा संख्येने नागरिक पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरावर तरूण मंडळी उत्साहात नाचत होती आणि स्फुर्तिदायक घोषणा देत होती. या शिवाय सजलेले बैलगाडय़ा, रथ शोभायात्रेची शोभा वाढवित होते. लहान व तरूण मुले बाल शिवाजी, जिजाऊ, झाशीची राणी, राम, लक्ष्मण, सीता बनून व रथांमध्ये व घोडय़ांवर आरूढ होऊन नागरिकांचे स्वागत स्वीकारत होते. त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. भगवे फेटे घातलेले पुरूष आणि भगव्या रंगाच्या साडय़ा नेसलेल्या महिला यामुळे सगळीकडे भगवा रंग भरून राहिला होता. सीमा सुरक्षा दल, विविधतेत एकता, स्वच्छ भारत अभियान या विषयांवर चित्ररथ सामाजिक संदेश देत फिरत होते. मल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती. लहान मुलांची लेझिम पथकेही कौतुकाचा विषय ठरली. सर्व नागरिकांना यावेळी बत्ताशा वाटून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. यावेळी पोलिसांना मानाची गुढी देण्यात आली. यावेळी पहिल्यांदा समितीने रांगोळी, चित्ररथ, वेशभुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात दहिसर भागातील १७ सोसायटय़ांनी सहभाग नोंदविल्याची माहिती समितीचे सुरेंद्र तन्ना यांनी दिली. पारितोषिक वितरण सोहळा व यात्रेचा समारोप ऐतिहासिक व पुरातन मंडपेश्वर गुंफेजवळ झाली.
गुढीपाडव्याला आपापल्या घरी गुढीची साग्रसंगीत पूजा करून सकाळी नऊच्या सुमारास दादरकर आणि माहीमकर शोभायात्रांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. सकाळी सातपासून शिवसेना भवनच्या समोर ‘हिंदू नववर्ष स्वागत समिती’तर्फे पूजेचे आयोजन केले होते. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास माहीम मच्छीमार कॉलनी आणि प्रभादेवी येथून दोन शोभायात्रा निघाल्या. दुपारी बाराच्या सुमारास या शोभायात्रा शिवसेना भवनच्या आवारात येऊन पोहोचल्या. त्यानंतर शिवाजी पार्क येथे गतिमंद मुलांच्या सोबतीने शोभायात्रांचा समारोप करण्यात आला. कित्येक दादरकरांनी वर्षांच्या पहिल्या दिवशी भल्यापहाटे सिद्धिविनायकाला जाऊन गणरायाचे दर्शन घेण्यास प्राधान्य दिले. दादर ते माहीम संपूर्ण रस्त्यावर नारंगी पताका फडकविण्यात आल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘हिंदू नववर्ष स्वागत समिती’तर्फे या शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या शोभायात्राची मूळ थीम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ होती. माहीम आणि प्रभादेवी येथून विविध विषयांवरील पाच चित्ररथ निघाले होते. त्यामध्ये ६ ते १८ वयोगटाच्या मुलींचा रिदमिक जिम्नॅस्टिक, मल्लखांब, कोळीनृत्य अशा विविध मनोरंजनात्मक कलांचा समावेश केला होता. तसेच मागच्या वर्षी भारताच्या यशस्वी मंगळमोहिमेवर आधारित मंगळायनचा देखावाही चित्ररथावर रेखाटला होता. माहीममध्ये कोळीबांधवांनी चित्ररथावर एक प्रतीकात्मक बोट आणि कोळीवाडय़ातील दृष्यही रेखाटले होते. नारंगी फेटे बांधून लेझीम आणि ढोल-ताशांच्या ठेक्यावर ताल धरत या शोभायात्रा शिवसेना भवन येथे पोहोचल्या. शाळकरी चिमुरडय़ांपासून ते बचतगटाच्या महिलांपर्यंत विविध वयोगटाच्या लोकांनी या शोभायात्रांमध्ये भाग घेतला होता. याशिवाय दादरमध्ये विविध समाजिक संस्थांच्या छोटय़ा शोभायात्राही निघाल्या होत्या. त्यामध्ये सध्याच्या स्त्रीभ्रूण हत्यासारख्या ज्वलंत विषयावर जनजागृती केली गेली.