#MeToo प्रकरणात अभिनेते आलोकनाथ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विनिता नंदा यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आलोकनाथांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आलोकनाथ यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून हा आलोकनाथांसाठी मोठा हादरा मानला जात आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर #MeToo मोहिमेअंतर्गंत केलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर कलाविश्वात #MeToo मोहिमेची लाट उसळली होती. अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला या मोहिमेअंतर्गत वाचा फोडली. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शिका विनता नंदा यांनीदेखील अभिनेता आलोकनाथ यांच्यावर आरोप केले होते.

कलाविश्वामध्ये संस्कारी बापूजी अशी ओळख निर्माण केलेल्या आलोकनाथ यांनी १९ वर्षापूर्वी बलात्कार केल्याचा आरोप विनता नंदा यांनी केल्या होता. विनता नंदा यांच्या आरोपानंतर अनेक महिलांनी आलोक नाथ यांच्याविरुद्ध आवाज उठविला होता. त्यानंतर मंगळवारी (२० नोव्हेंबर) ओशिवरा पोलिसांनी आलोकनाथ यांच्याविरोधात बल्काराचा गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र अद्यापपर्यंत आलोकनाथ यांना अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, आलोकनाथ यांच्याविरोधात नंदा यांनी ८ ऑक्टोबरला एक लेखी तक्रार ओशिवरा पोलिसांना दिला होती. त्या तक्रारीची शाहनिशा केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल,असे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले होते. अखेर मंगळवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जबरी आणि अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी भादवी ३७६(१) आणि ३७७ ही कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.