लॉकडाउनमध्ये बाहेर फिरणे अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटाणीला महागात पडले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार टायगर आणि दिशा मंगळवारी दुपारी २ वाजता मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात फिरत होते. लॉकडाउनमध्ये बाहेर फिरल्यामुळे मुंबई पोलिसांनी दिशा आणि टायगर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता मुंबई पोलिसांनी ट्वीट तर अप्रत्यक्षपणे दिशा आणि टायगरला टोला लगावला आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्वीटमध्ये टायगरच्या हीरोपंती चित्रपटाचा उल्लेख केला आहे. पण त्यांनी टायगर किंवा दिशाच्या नावाचा उल्लेख न करता हीरोपंती केल्यास महागात पडते असे अप्रत्यक्ष म्हटले आहे.

“व्हायरस विरोधात सुरु असलेल्या लढाईमध्ये वांद्रे येथील रस्त्यांवर ‘मलंग’ बनून फिरणाऱ्या दोन कलाकारांना विरोधात आयपीएस (भादंवि) कलम १८८, कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही मुंबईकरांना विनंती करतो की गरज नसताना ‘हीरोपंती’ करणे टाळा, ज्यामुळे करोनाच्या सूचनांचे उल्लंघन होईल” या आशयाचे ट्वीट मुंबई पोलिसांनी केले आहे.

आणखी वाचा : पत्नीच्या मृत्यूप्रकरणी ‘यूट्यूबर’ जीतू जानला पोलिसांनी केली अटक

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, टायगर आणि दिशा मंगळवारी १ जून रोजी जीममधून परत येत होते. त्याचवेळी ते वांद्रे परिसरात बॅंडस्टॅंड परिसरात दुसरी फेरी मारताना दिसले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना अडवले होते. त्यानंतर करोनाच्या नियमांलेच पालन न केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, दिशाचा ‘राधे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यानंतर दिशा ‘एक व्हिलन २’ या चित्रपटात दिसणार आहे. तर टायगर ‘हीरोपंती २’, ‘बागी ४’ आणि ‘गणपत’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.