18 October 2018

News Flash

फ्लॅशबॅक : ती उगाचं परतली…

इतक्या काळात ती किती बदललेली असेल?

तिचा प्रभाव जास्त असल्याने चित्रपटातील शत्रुघ्न सिन्हा, प्रसन्नजीत , नवतारका मधुश्री, अनिल धवन यांचे फारसे अस्तित्व जाणवले नाही.

चित्रपटाच्या विश्वात काही धक्के खात खातच नवीन अनुभव घ्यावे लागतात. मुमताजच्याच बाबतीतच बघा कसे ते? दारासिंग-रंधवा अशा कुस्तीवीर हिरोंची ‘फौलाद ‘ इत्यादी स्टंटपटाची नायिका म्हणून ओळखली जाणारी मुमताज आपली मेहनत, अभिनय, सौंदर्य, नृत्य या गुणांसह मुख्य प्रवाहातील चित्रपटातून भूमिका करू लागली हा त्या काळात सांस्कृतिक धक्काच तर होता.

दिलीपकुमार, देव आनंद, धर्मेंद्र, राजेश खन्ना, जीतेन्द्र इत्यादी आघाडीच्या नायकांची नायिका बनण्यात ती यशस्वी ठरली. आपले एक स्थान निर्माण केले आणि तिने उद्योगपती मयूर वाधवानी यांच्याशी लग्न करून १९७६ साली ‘नागिन ‘ ‘लफंगे ‘ चित्रपटानंतर अभिनय संन्यास घेतला. हादेखील धक्काच तर होता . त्यानंतर मॅटीनी शोला अथवा दूरदर्शनवर तिचे जुने चित्रपट पाह्यची सवय लावून घ्यावी लागली.

पण त्यानंतर बराच काळाने एकदा निर्माते पहलाज निहलानी यांजकडून नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताचे आमंत्रण आले, डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘आंधिया ‘ (१९९०) चा जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुहूर्त. प्रमुख भूमिकेत मुमताज. आश्चर्य वाटावे असे हे आमंत्रण होते. मुमताजचे पुनरागमन? इतक्या काळात ती किती बदललेली असेल? तो बदल तिच्या चाहत्यांना कसा वाटेल? वगैरे वगैरे प्रश्नांसह ‘आंधिया ‘च्या मुहूर्ताला हजर तर राहिलो. पण निराश झाली. डिंपल कापडियाने ‘बॉबी ‘ (१९७३) नंतर बारा वर्षांनंतर ‘सागर ‘ (१९८५) द्वारे पुनरागमन करताना फिटनेसची पुरेपूर काळजी घेतली तीच महत्त्वाची गोष्ट मुमताज विसरली होती. पण चित्रपटाच्या जगात पुनरागमनचा काही वेगळाच आनंद असतो. तो त्या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळेस त्या कलाकाराच्या वागण्यात, बोलण्यात जाणवतो. फिल्मी संस्कृतीनुसार त्या कलाकाराचे कौतुकही होत असते. या क्षणावर मुमताजचा प्रभाव जास्त प्रमाणात असल्याने चित्रपटातील शत्रुघ्न सिन्हा, प्रसन्नजीत , नवतारका मधुश्री, अनिल धवन यांचे फारसे अस्तित्व जाणवले नाही हे वेगळे सांगायला हवे काय?

विशेष म्हणजे ‘आंधिया’ वेळेत पूर्ण होऊन पडद्यावर आला . मुंबईत त्याचे मेन थिएटर मेट्रो होते. मुमताजचे पुनरागमन पाह्यला तिचे चाहते हमखास गर्दी करतील हा विश्वास मात्र फर्स्ट डे फर्स्ट शोलाच फसला. कारण आता ‘आप की कसम’, ‘प्रेम कहानी’ या काळातील मुमताज पडद्यावर दिसणे शक्यच नव्हते.

मुमताजच्या या पुनरागमनाच्या चर्चेचा फायदा कोणाला झाला माहित्येय? त्याच दिवशी मुमताजचा राजेश खन्नासोबतचा ‘बिंदीया चमकेगी…’ चा ठसकेबाज नृत्याने मनोरंजन करणारा राज खोसला दिग्दर्शित ‘दो रास्ते’ (१९६९) हा सुपर हिट चित्रपट मेट्रोजवळच्याच एडवर्ड इत्यादी सिंगल स्क्रीन थियेटर्समध्ये रिपिट रनला प्रदर्शित करण्यात आला, त्याला झाला .

एखाद्या कलाकाराच्या पुनरागमनापेक्षा एखादा जुना लोकप्रिय चित्रपट पुन्हा पुन्हा कितीदाही प्रदर्शित करणे असे फायद्याचे असते. कारण त्या चित्रपटातील कलाकारचे रूपडे कधीच बदललेले नसते. हेच केवढे मोठे वास्तव आहे.
दिलीप ठाकूर

First Published on December 8, 2017 5:00 am

Web Title: mumtaz bollywood comeback aandhiyan movie