छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. यातीलच एक कलाकार म्हणजे बबिताजी. अभिनेत्री मुनमुन दत्तने ही भूमिका साकारली असून तरुणाईमध्ये तिची तुफान क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. मात्र अनेकदा मुनमुनला ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो. त्यामुळे या ट्रोलर्सला मुनमुन नेमकं कसं उत्तर देते हे तिने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

“सोशल मीडियावर ट्रोलिंग हे कायमच होत असतं. माझ्या बाबतीतदेखील अशा काही घटना घडल्या आहेत. काही वेळा माझ्या फोटोंचा चुकीचा वापर केला गेला आहे. माझे फोटो मोर्फिंग करुन वापरण्यात आले आहेत. तसंच अनेकदा काही जण कमेंट्समध्येदेखील अर्वाच्च आणि अश्लील भाषेत बोलतात. त्यामुळे अशा लोकांना मी थेट ब्लॉक करते”, असं मुनमुन म्हणाली.

पुढे ती म्हणते, “अनेकदा मी ट्रोलर्सला सडेतोड उत्तरदेखील देते. मात्र, मला असं वाटतं की हे ट्रोलिंग वगैरे सगळं लक्ष वेधून घेण्यासाठी असतं. त्यामुळे शक्यतो मी रिप्लाय देणं टाळतेच. परंतु, काही वेळा सडेतोडपणे उत्तरही द्यावं लागतं. तसंच माझ्या फोटोवर कोणी वाईट कमेंट केलेली मला आवडत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा मी माझं कमेंट सेक्शन ऑफ करते. केवळ फॉलोअर्स वाढवायचे म्हणून मी कोणाला अॅड करत नाही. त्यामुळे माझ्या फॉलोअर लिस्टमध्ये साधा एक व्यक्ती असेल तरी मला चालेल”.

दरम्यान, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतून मुनमुन दत्त घराघरात पोहोचली आहे. उत्तम फॅशनसेन्स आणि अभिनय यांच्या जोरावर तिचे असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं.