ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण मोहम्मद खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त तसेच हृदयेश आर्टस संस्थेच्या २९ व्या जयंतीनिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. असे या एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. खय्याम यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील कारकीर्द मोठी असून त्यांनी तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे. २०११ मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. खय्याम यांच्याआधी हा पुरस्कार गानकोकीळा लता मंगेशकर, इतिहासाचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अभिनेते अमिताभ बच्चन, सुलोचना लाटकर, पंडित जसराज, जावेद अख्तर, ए.आर.रेहमान यांना देण्यात आला आहे.

१८ फेब्रुवारी १९२७ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचं पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी. लहानपणापासून त्यांना शिक्षणाऐवजी संगीतात अधिक रस होता. मोहम्मद चिश्ती, पं. हुस्नलाल भगतराम आणि त्यांचे बंधू पं. अमरनाथ यांच्याकडे त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला तो गायक म्हणून. पं. हुस्नलाल भगतराम यांनी त्यांच्या ‘रोमिओ ज्युलिएट’मध्ये त्यांना गाण्याची संधी दिली. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडेच साहाय्यक म्हणून काम केलं. १९४७-४८ चा तो काळ. देशाची फाळणी झालेली. सर्वत्र असुरक्षितता, अविश्वासाचं वातावरण. अशा वेळी त्यांच्या गुरुजींनी त्यांना बजावलं, ‘मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी को कुछ दिन भूल जाओ.. आज से आप शर्माजी!’ आणि मग ‘शर्माजी वर्माजी’ या टोपणनावाने खय्याम यांनी त्यांच्या गुरुजींच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिलं. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. त्यानंतर त्यांनी असंख्य चित्रपट केले आणि कधीच मागे वळून पाहिले नाही.