18 September 2020

News Flash

ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकाराला गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

राम लक्ष्मण

ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांना राज्य सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकाराला गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी हा पुरस्कार पुष्पा पागधरे, माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंद शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग यांना देण्यात आला आहे.

राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली. ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी. हीच परिस्थिती ‘राजश्री प्रॉडक्शन’च्याही बाबतीत. ‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.

जेव्हा विजय पाटील मुंबईत आले तेव्हा त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले. नंतर किडनीच्या आजाराने सुरेंद्र हेंद्रे यांचे निधन झाले. याच काळात ‘एजंट विनोद’चे काम मिळाले. पण हेंद्रेंच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे विजय पाटील यांना बरोबर वाटेना. त्यामुळे त्यांनी राम-लक्ष्मण नाव कायम ठेवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:12 pm

Web Title: music composer raam laxman gets maharashtra government lata mangeshkar award
Next Stories
1 #URITeaser : ‘ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर मे घुसेगा भी और मारेगा भी’
2 #SuiDhaaga : जाणून घ्या, सुई धागा पाहण्यामागची ‘ही’ पाच कारणे
3 त्यावेळी इरफान खान आणि सुनील शेट्टी माझ्यापाठीशी उभे राहिले- तनुश्री दत्ता
Just Now!
X