सामाजिक समस्या, नवनवीन कथा, कल्पना कॅमेराबद्ध करून सर्जनशील लघुपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांसाठी १८ डिसेंबर रोजी पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे युनिव्हर्सल मराठीच्या वतीने ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.
या महोत्सवासाठी सामाजिक जनजागृती, अॅनिमेशन, मोबाइल शूट फिल्म, जाहिरातपट आणि आंतरराष्ट्रीय लघुपट अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यासाठी २५ नोव्हेंबपर्यंत विनामूल्य प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवात अभिनेते विजय पाटकर, लेखक-दिग्दर्शक शंतनू रोडे आदी उपस्थित राहणार आहेत. लघुपटांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जाणार आहे. विजेत्यांना रोख रकमेसहित पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. या वेळी लघुपट निर्मात्यांना तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी दिली. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी ९७६८९३०८५३, ९८३३०७५७०६ किंवा http://www.mymumbaishortfilmfestival.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.