करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने बॉलिवूडला हादरून टाकलं आहे. बॉलिवूड लोकप्रिय संगीतकारांच्या जोडींपैकी एक म्हणजे नदीम- श्रवण यांची जोडी. यातील संगीतकार आणि दिग्दर्शक श्रवण राठोड यांचे २२ एप्रिल रोजी करोनामुळे निधन झाले. श्रवण यांचे निधन झाल्यामुळे नदीम यांची एक इच्छा अपूर्ण राहिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नुकताच नदीम यांनी इ-टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, ‘मला श्रवणसोबत फेअरवेल टूर करायची होती. जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात जाऊन आमची हिट गाणी गायची होती. आम्ही जेव्हा खरोखर असे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लॉकडाउन झाला. आम्हाला वाटले होते करोना व्हायरस गेल्यानंतर सर्वकाही नीट होईल आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे काम करु’ असे नदीम म्हणाले.

पुढे ते म्हणाले श्रवण यांच्या निधनाच्या २५ दिवस आधी त्यांचे यावर बोलणे देखील झाले होते. ‘आम्ही जवळपास २० ते २५ मिनिटे गप्पा मारल्या होत्या. काश त्या गोष्टी तशाच राहिल्या असत्या आणि आम्ही सर्व गोष्टींवर तोडगा काढून पुन्हा एकत्र काम करु शकलो असतो’ असे नदीम म्हणाले.

नदीम- श्रवण यांनी ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.