नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने विक्रमी कमाई करत मराठी कलाविश्वाचं नाव सर्वच स्तरांमध्ये उंचावलं होतं. अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतालाही याड लावणाऱ्या या चित्रपटाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पाकिस्तानच्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे. त्यामुळे आर्ची आणि परश्याचं हे सैराट प्रेम शेजारी राष्ट्रातील प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.

‘सैराट’शिवाय एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाचीही या चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. राजामौली यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त एकूण नऊ भारतीय चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

कराचीमध्ये २९ मार्च ते १ एप्रिल या दरम्यान पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवासाठी निवड झालेल्या चित्रपटांमध्ये ‘सैराट’ हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे ‘सैराट’चं प्रशंसनीय ठरत आहे. या महोत्सवात शाहरुखचा ‘डिअर जिंदगी’, ‘आँखो देखी’, ‘हिंदी मीडियम’, ‘कडवी हवा’, ‘निलबटे सन्नाटा’, ‘साँग्स ऑफ स्कॉरपियन्स’ हे चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.

भारतातून निवड करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये ‘सैराट’चाही उल्लेख होणं ही अभिमानाची बाब आहे. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या नवोदित कलाकारांच्या साथीने नागराज मंजुळे यांनी एक वेगळी पण, तितकीच प्रभावी कथा प्रेक्षकांसमोर सादर केली होती. दमदार कथानक, पार्श्वसंगीत, चित्रपटाचं लोकेशन आणि सर्वसामान्यांच्या काळजाला हात घाणारा कलाकारांचा अभिनय या साऱ्याच्या बळावर या चित्रपटाने बऱ्याच विक्रमांची नोंद केली. मुख्य म्हणजे बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट खऱ्या अर्थाने उजवा ठरला होता.