अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये अनेक व्यक्तींनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तनुश्रीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता बॉलिवूडमधील काही मंडळी नाना पाटेकरांच्या मदतीला पुढे आले आहेत.यातच सेन्सॉर मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानीदेखील नानांच्या बाजूने उभे राहिले आहेत.

‘हॉर्न ओके प्लीज’ हा चित्रपट २००८ सालचा असून त्यावेळी मी प्रोड्युसर एसोसिएशनच्या अध्यक्षपदी होतो. ज्यावेळी सेटवर गोंधळ झाल्याची माहिती मला मिळाली त्यावेळी मी सेटकडे धाव घेतली होती. परंतु यावेळी नानांनी कोणतेही आक्षेपार्ह वर्तन केलं नव्हतं’, असं पहलाज यांनी ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

‘तनुश्री दहा वर्षानंतर नानांवर गैरवर्तणुकीचं आरोप करत आहे. परंतु त्यावेळी तनुश्रीने याविषयी कोणतीच वाच्यता केली नव्हती. विशेष म्हणजे जर काही झालं असेल तर सांग. आम्ही तक्रार दाखल करण्यात तुझी मदत करतो, असंही म्हटलं होतं. मात्र तेव्हा ती काहीच  म्हणाली नव्हती. परंतु  आताच ती असे आरोप का करतेय हे समजत नाहीये’.

पुढे ते असंही म्हणाले, ‘सध्या तनुश्री हे सारं प्रसिद्धी मिळविण्यासाठी करत आहे. नाना पाटेकर महिलांसोबत असभ्य वर्तन करुच शकत नाहीत. त्यांनी अनेक संस्थांना  मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचं लक्ष कायम समाजकार्याकडे असतं. त्यामुळे ते असं करुच शकत नाही’.

दरम्यान, नाना पाटेकरांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं आहे. नानांसोबतच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीदेखील तनुश्रीला नोटीस पाठविली आहे.