बॉलिवूड अभिनेता नावजुद्दीन सिद्दीकीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. या पोस्टमध्ये नवजुद्दीनने त्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जवळपास २० वर्षे लागली असल्याचे म्हटले आहे.

‘२० वर्षांपूर्वी चित्रपट कलकत्ता मेलचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी या चित्रपटाच्या एका सहाय्यक दिग्दर्शकाने मला सांगितले होते की तो मला या चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी भेट घालून देईल. तसेच त्याने मला तो जेव्हा हात वर करेल तेव्हा तेथे पोहोचण्यास सांगितले होते. मी शूटींग सुरु असलेल्या ठीकाणी पोहोचलो आणि जवळपास एक तासानंतर त्या सहाय्यक दिग्दर्शकाने हात वरती केला. मी गर्दीतून वाट काढत त्याच्या पर्यंत पोहोचलो. पण तेथे पोहोचल्यावर त्याने मला सांगितले की एका वेगळ्या कारणासाठी हात वर केला आहे’ असे नवाजुद्दीनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्याने पुढे सांगितले की, ‘त्यानंतर त्याने पुन्हा हात वर केला नाही आणि माझी दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्याशी भेटही घालून दिली नाही. मी पुन्हा मुंबईच्या गर्दीत हरवून गेलो आणि विचार करत राहिलो की सुधीर मिश्रा यांच्यासोबत काम करण्याची संधी कधी मिळेल. आता जवळपास २० वर्षांनंतर मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.’

नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच सुधीर मिश्रा यांच्या ‘सीरियस बॉस’ या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते एकत्र काम करणार आहेत. पण या बाबत चित्रपट निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.