सध्या सगळीकडेच नेटफ्लिक्सच्या वेब सीरिज आणि चित्रपटांचे क्रेझ पाहायला मिळते. त्यातील ‘बिच्छु हैं, अपनी कहानी चिपक गयी है आपको!’ असे म्हणत आपली गोष्ट सांगणारा गणेश गायतोंडे उर्फ नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजने प्रेक्षकांवर काही वेगळीच जादू केली होती. आता नवाजच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदीची बातमी आहे.

लवकरच नवाज नेटफ्लिक्सच्या एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिरीयस मॅन’ असून हा चित्रपट मनु जोसेफ यांच्या पुस्तकावर आधारित आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधिर मिश्रा करणार आहेत. हा चित्रपट झोपडपट्टीत राहणाऱ्या धूर्त इसमाची कहाणी आहे. नवाजुद्दीनने साकारलेला हा इसम संपूर्ण देशाला असा विचार करायला भाग पाडतो की त्याचा खरंतर सामान्य कुवतीचा दहा वर्षांचा मुलगा प्रचंड बुद्धीमान आहे, जीनियस आहे. अर्थात, ही खेळी करताना त्याच्या लक्षातही येत नाही या जीवघेण्या खेळात जर का कुणी शिकार ठरणार असेल तर त्याचा मुलगाच!

या चित्रपटात काम करण्यासाठी नवाज फार उत्साही असल्याचे दिसत आहे. ‘मी नेटफ्लिक्स च्या “सिरीयस मॅन” या चित्रपटाचा भाग होण्यासाठी आणि सुधिर मिश्रा यांच्यासह काम करण्यासाठी फार उत्साही आहे. सेक्रेड गेम्सनंतर या चित्रपटाद्वारे मी पुन्हा एकदा नेटफ्लिक्ससाठी काम करणार आहे आणि मला आशा आहे की गणेश गायतोंडे प्रमाणेच या भूमिकेलाही चाहत्यांचे प्रेम मिळेल. सध्या मी सेक्रेड गेम २च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. चाहत्यांच्या प्रतिक्रिया काय असणार हे पाहण्यासाठी मी आतुर आहे’ असे नवाज म्हणाला.