अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दीकीने इमेलद्वारे घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. नवाजुद्दीन व आलियाच्या लग्नाला १० वर्षे झाली असून या दोघांना दोन मुलं आहेत. लग्नाला एक वर्ष झालं, तेव्हापासूनच वैवाहिक जीवनात चढउतार सुरू झाल्याचं आलियाने सांगितलं. ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यावर व त्याच्या कुटुंबीयांवर मानसिक व शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत.

“लग्नाच्या वर्षभरानंतर मला त्रास देणं सुरू झालं होतं. पण मी हे कोणालाच न सांगता सर्व सहन केलं” हे सांगताना नवाजुद्दीनच्या भावाने तिच्यावर हात उचलल्याचा खुलासाही आलियाने केला. नवाजुद्दीनच्या पहिल्या पत्नीनेही याच कारणामुळे घटस्फोट दिल्याचं आलियाने सांगितलं. “मी कधीच काही करू शकत नाही, अशी वागणूक मला नवाजुद्दीनने मला दिली. तो मला इतर लोकांसमोर बोलूही द्यायचा नाही. त्याने माझ्यावर कधी हात उचलला नाही. पण त्याचं ओरडणं आणि त्याचे वाद माझ्या सहनशक्तीपलीकडे गेले आहेत. त्याच्या कुटुंबीयांनीही माझं मानसिक व शारीरिक शोषण केलं. त्याच्या भावाने माझ्यावर हात उगारला. मुंबईत त्याची आई, त्याचा भाऊ आणि बहिणी आमच्यासोबतच राहायचे. गेल्या काही वर्षांपासून मी खूप काही सहन करतेय. त्याची पहिली पत्नीसुद्धा याच कारणामुळे सोडून गेली होती. या घरात आधीच चार घटस्फोट झाले आहेत. त्यामुळे घटस्फोट हा त्यांच्या कुटुंबाचा एक भागच झाला आहे. हा पाचवा घटस्फोट असेल”, असे आरोप आलियाने केले.

घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा ताबा आपल्याकडे असावा, अशी मागणी आलियाने केली आहे. नवाजुद्दीनने कित्येक महिने मुलांची भेट घेत नाही असं सांगत ती पुढे म्हणाली, “इतके मोठे कलाकार असूनसुद्धा काय उपयोग? जर तुम्ही एक चांगली व्यक्ती होऊ शकत नाही. माझ्या मुलांना वडील शेवटचे कधी भेटले हेसुद्धा आठवत नसावं. नवाजुद्दीनला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे माझ्या मुलांनाही सवय झाली आहे. त्यामुळे दोन्ही मुलांचा ताबा मला हवा आहे.”

पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवल्यावर अद्याप नवाजुद्दीनने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. लॉकडाउन असल्यामुळे इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे नोटीस पाठवल्याचं आलियाच्या वकिलांनी सांगितलं. लॉकडाउन संपल्यानंतर कायदेशीररित्या प्रक्रिया पूर्ण करू, असंदेखील ते म्हणाले.