बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी वाट निर्माण करणाऱ्या अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीची आई मेहरून्निसा सिद्दीकी यांची ‘बीबीसी’च्या सर्वात १०० प्रभावी महिलांमध्ये निवड झाली आहे. ज्या यादीत नासाची वैज्ञानिक आहे, मिताली राजसारखी आपली तरुण क्रिकेट संघाची कर्णधार आहे अशा जगभरातील कर्तृत्ववान महिलांमध्ये माझ्या आईचीही निवड झाली हा सन्मान मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे, अशा शब्दांत नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी आपल्या भावना ‘रविवार वृत्तान्त’कडे व्यक्त केल्या. कुठल्याही क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे, स्वत:ला तयार केलं पाहिजे हा त्यांचा मंत्र आहे. आयुष्यभर तो मला उपयोगी पडला आहे, असंही नवाझुद्दीन यांनी सांगितलं.

नवाझुद्दीन सिद्दीकी यांची आई सुरुवातीपासूनच मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहिली आहे. माझी आई स्वत: कमी शिकलेली होती. एका कर्मठ मुस्लीम कुटुंबातील महिला असूनही तिने त्या विचारांमधून बाहेर पडण्याचं धाडस दाखवलं. आज ही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. मात्र ४० वर्षांपूर्वी माझ्या आईसाठी कर्मठ मुस्लीम कुटुंबातील विचारांना झुगारून देणं ही खूप अवघड गोष्ट होती. ती स्वत: बाहेर पडली. स्वत: शिकली आणि मग तिने आम्हालाही शिकवलं. आम्ही नऊ भावंडं आहोत. आमच्या गावातून ग्रॅज्युएट होणारी आम्ही पहिली भावंडं होतो. तिने फक्त शिक्षण दिलं नाही, तर स्वत:च्या पायावर उभं राहण्याचे संस्कारही आम्हाला दिले, असं सांगणाऱ्या नवाझने आपल्या आईने आजवर दोनशे ते तीनशे मुलांना शिक्षित केले असल्याची माहितीही दिली. आई सुरुवातीपासूनच मेहनती होती आणि तिच्या या सवयींपासूनच कायम प्रेरणा मिळत आली आहे, असं तो म्हणतो. आईच्या सवयी आपल्याही अंगात आहे असं सांगणारा नवाझ कोणताही ऋतू असो, ती आजारी असो किंवा काहीही असो दररोज सकाळी पाच वाजता उठून गाईगुरांना चारा घालणं, दूध काढणं, शेतावरची कामं अशी सगळी कामं ती जातीने करायची. आजही करते. तिची हीच सवय मलाही लागली. आजही कि तीही काम असलं तरी मी सकाळी पाच वाजता उठतो. तिने लावलेल्या या सवयी अशा सह्जी सुटणाऱ्या नाहीत. इतकी वर्ष शिस्तीने तिने आपलं जीवन घडवलं आहे. आज तिचं वय ६८ वर्ष आहे. पण तिला जो सन्मान मिळाला आहे त्यामुळे तिचं आयुष्य आणखी काही वर्ष वाढेल, यात शंका नाही, असंही तो म्हणतो.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर आईमुळेच ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश घेऊन अभिनयाचे धडे गिरवले, अशी माहिती त्याने दिली. शिकत असतानाच नाही तर शिकून करिअरसाठी म्हणून मुंबईत आल्यानंतरही स्ट्रगलच्या काळात आईनेच मोलाची मदत केली असंही तो सांगतो. माझा स्ट्रगल सुरू होता. तेव्हा कधीकधी खूप नैराश्य यायचे, तणावात असायचो. अशावेळी ती नेहमी पत्रं लिहायची आणि या पत्रांमधून तिने कविता लिहिलेल्या असायच्या. कधी कधी. ‘मिटा दे अपनी हस्ती.’ असं एकच आदेशवजा वाक्य लिहून कामाची प्रेरणा द्यायची. तर कधी ‘दाना खाक मे मिलकरही गुल ए गुलजार होता है.. ’अशा शब्दांत माझं धैर्य वाढवायची.‘ ऐसे भी दिन आता है की कचरें का ढेर भी बदल जाता है, आपके भी दिन आएंगे’ म्हणत सतत कामासाठी मला उद्युक्त करत रहायची. तिच्या या कवितांनीच संघर्षांच्या काळात जगण्याची जिद्द आणि बळ दिलं असं त्याने सांगितलं. आईचेच हे गुण आपल्या अभिनयातही उतरले आहेत असं तो विश्वासाने सांगतो. तिच्या या घडवण्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी माझ्यावर होणारच होता. आज अभिनय करताना मी जो विचार करतो, काही संवाद म्हणतो या सगळ्यामागे तिचे विचार आहेत. शेवटी आपल्या मुलाच्या यशात कुठे ना कुठेतरी प्रत्येक आईची मेहनत असते. त्यासाठी ती घोर मेहनत करते. माझ्याही आईने अशीच मेहनत घेतली आहे. तिचे विचार, तिची प्रेरणा, तिचं अवघं आयुष्य याचा मला आजवर फायदा झालेला आहे आणि यापुढेही होत राहील, हे तो ठामपणे सांगतो.