|| भक्ती परब

‘जाने भी दो यारो’, ‘मंडी’पासून ते अलीकडच्या ‘मुल्क’, ‘बधाई हो’ चित्रपटातील सशक्त भूमिकांसाठी चर्चेतलं नाव म्हणजे नीना गुप्ता. दूरचित्रवाणीवरही १५हून अधिक मालिकांमध्ये अभिनय करताना ‘साँस’सारख्या मालिकेचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयही त्यांनी केला. ‘बधाई हो’ चित्रपटातील भूमिकेनंतर आता ‘कहने को हमसफर है’ या मालिकेची मूळ कथा लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. बदलत्या काळानुसार पती-पत्नीचं नातंही विविध कसोटींवर तावून सुलाखून निघतंय. नेमक्या याच क्षणी ही वेबसीरिज आल्यामुळे साहजिकच तिच्या विषयाने लोकांचे लक्ष वेधले आहे. यानिमित्ताने नीना गुप्ता यांच्याशी साधलेला संवाद..

‘खंबीर स्त्री’ या दोन शब्दांतील खंबीर हा शब्द स्त्रियांच्या बाबतीत नेहमी नकारात्मक पद्धतीने वापरला जातो. मी माझ्या कामामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहावं, ना की माझ्या वैयक्तिक आयुष्यामुळे. मी वैयक्तिक आयुष्यात एकल माता म्हणून वावरले तसं इतर महिलाही वावरतातच की.. मी काय वेगळं केलं त्यात? असं नीना गुप्ता म्हणाल्या.

वेबसीरिजविषयी त्यांनी सांगितले, मी छोटीशी कथा लिहिली होती, ती कथा संकल्पनेच्या पातळीवर होती. ती विस्तृतपणे लिहिली नव्हती. ती घेऊ न मी निर्माती एकता कपूरकडे गेले होते. तिने कथा वाचली. कथा तिला खूप आवडली. यात मला काम करायला आवडेल, असं मी तिला म्हटले त्यावर, या भूमिकेसाठी तुमचं वय योग्य नाही. तुमच्यापेक्षा तरुण पण मध्यमवयीन अभिनेत्रींना त्यातील पूनम आणि अनन्या या दोन मुख्य भूमिकांसाठी घ्यावे लागेल, असे ती म्हणाली. मग एकताने त्या कथेचं वेबसीरिजमध्ये रूपांतर करण्यासाठी सृष्टी बहल आणि गोल्डी बहल यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यांनी कथाविस्ताराची जबाबदारी विभा सिंग आणि जया मिश्रा यांच्याकडे दिली. परंतु, कथाविस्तार झाल्यानंतर कशाप्रकारे ती वेबसीरिज साकारली गेली, ती मी अजून पाहिली नाही. पण वेबसीरिज खूप लोकप्रिय झाली आहे.

‘बधाई हो’ या चित्रपटात इतक्या वर्षांनंतर सशक्त भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर आल्या आणि त्यांच्या भूमिकेला उदंड प्रतिसादही मिळाला. त्याबद्दल बोलताना, मी ज्या भूमिका स्वीकारते, त्या भूमिकेला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करते, असं त्यांनी सांगितलं. ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलीशी वाटली पाहिजे, खोटी वाटता कामा नये. त्यामुळे मेलोड्रामा किंवा अतिरंजित अभिनय करणं, या गोष्टी मी टाळते. मी स्वत: मेहनत घेऊन त्या भूमिकेत काही गोष्टी अधिकच्या घालून ती कशी खुलवता येईल याकडे लक्ष देते. तसंच आपल्या आयुष्याच्या जितक्या जवळ नेता येईल तेवढी नेण्याचा प्रयत्न करते. कदाचित हेच या भूमिकांच्या यशामागचं कारण असेल, असं त्या सांगतात.

नीना यांनी दूरचित्रवाणीलाही नेहमीच आपलंसं मानलं आहे. त्यांच्या ‘साँस’सारख्या मालिका खूप गाजल्या. त्यांनी दूरचित्रवाणीसाठी दिग्दर्शनही केलं आहे. आगामी दिग्दर्शन, अभिनय किंवा लेखन करण्याचा विचार आहे का, असं विचारल्यावर त्यांनी याबाबतीत आपण विचार केला असल्याचे सांगितले. परंतु त्याविषयी आता बोलणं योग्य ठरणार नाही. मला तिन्ही गोष्टी करायच्या आहेत. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन ही तिन्ही अंगं मला खूप आवडतात, असं त्या म्हणतात.

‘बधाई हो’ चित्रपटानंतर आशयप्रधान चित्रपटांविषयी चर्चा  होऊ  लागली त्याविषयी नीना म्हणाल्या, ही खूपच चांगली गोष्ट आहे. मनोरंजन क्षेत्रात आता परिवर्तनाचा काळ सुरू झाला आहे. अलीकडे फक्त तरुण नायक-नायिकांनाच घेऊन चित्रपट केले जात नाहीत. पण गोष्ट  सकस असेल तर तरुण, वयस्कर, मध्यमवयीन असा भेदभाव होत नाही. अशा सकस कथांवर निर्मात्यांनीही भर देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध प्रकारचं लेखन करणाऱ्या लेखकांना संधीची दारे खुली होतील. त्यांना मनापासून लिहाविशी वाटणारी गोष्ट ते कुठल्याही चौकटीत न अडकता लिहू शकतील. त्यामुळे त्यांच्यावर व्यावसायिक गणितांचा दबाव येणार नाही, पण अशा प्रकारचा आशयप्रधान चित्रपटांचा सुखद काळ लवकरच येईल. त्यामुळे विविध वयोगटांतील कलाकारांनाही भूमिका मिळतील.

सध्या चित्रपटातील स्त्रियांचे चित्रण, मुलींच्या बाबतीतील सरधोपट चित्रण या गोष्टीही बदलत आहेत. यावर प्रेक्षकसुद्धा बदलतो आहे. प्रेक्षकांना स्त्रियांचे धाडसी चित्रण आवडते आहे. प्रेक्षकांनी स्वीकारलं तरच तशा प्रकारे लिहिलं जातं. आजच्या महिला सक्षम आहेत, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात, नोकरी करतात, विविध पदं भूषवतात, खूप शिकतात, त्यामुळे या बदलाचं चित्र मनोरंजन माध्यमामध्ये उमटणं साहजिकच असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

मला यापुढे जाऊ न स्त्रीप्रधान विषय हाताळायचे आहेत. मग ते लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय यांपैकी माध्यम काहीही असेल. मला देशातील स्त्रियांची परिस्थिती पाहून खूप दु:ख होतं. त्यांच्याकडे पाहण्याची मानसिकता अजून मागासच आहे. यामध्ये बदल होण्यासाठी अजून १०० र्वष लागतील. आजचा समाज शिक्षित आहे, पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र अज्ञानी असल्यासारखाच वागतो. तिने शिक्षण घेतलं, पुढे जाऊ न करिअर करायचं म्हटलं तरी घरच्या जबाबदाऱ्या संपत नाहीत. अजूनही काही ठिकाणी मुलींना लग्नानंतर नोकरी करू दिली जात नाही. स्त्रियांची स्थिती खूप खराब आहे. पटकन बदल होणार नाहीत. गृहिणी असाल तरी त्रास सहन करावा लागतो, कामाच्या ठिकाणी त्यांना लैंगिक अत्याचाराचा, गैरवर्तणुकीचा सामना करावा लागतो, एकल माता म्हणून समाजाचा सामना करावा लागतो, अशी त्यांच्यावरच्या अन्यायाची किती तरी उदाहरणं देता येतील’, असंही त्या म्हणाल्या.

वेबसीरिज या माध्यमाकडे लेखिका म्हणून तुम्ही कसं पाहता, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, लेखकांसाठी हे प्रभावी माध्यम आहे. मी काही मोजक्याच वेबसीरिज पाहिल्या आहेत. नुकतीच ‘मेड इन हेवन’ नावाची वेबसीरिज पाहिली. त्यात विषयाची मांडणी अतिशय सुंदर करण्यात आली आहे. मी सुद्धा ‘पंचायत’ नावाच्या एका वेबसीरिजमध्ये काम करतेय, तीसुद्धा छान आहे. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य नेहमीच त्या त्या भूमिकेला किंवा व्यक्तिरेखेला एक वेगळा आयाम मिळवून देतं. त्यावर त्या हसून म्हणतात, मला चेहऱ्यावर नेहमी हसू आणत भूमिका साकारायच्या असतात, पण अलीकडे रडुबाई असलेल्याच भूमिका मिळतात. यावर तुम्ही लेखिकाही आहात तर तुम्ही तुमच्यासाठी तशा भूमिको का लिहीत नाही, असं विचारताच तोही विचार मनात असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘बधाई हो’मधील भूमिकाच माझा ड्रीम रोल होता. त्याचबरोबर ‘साँस’ मालिकेतील भूमिकासुद्धा ड्रीम रोलच होता. अजूनही एखादा लेखक माझ्यासाठी ड्रीम रोल लिहील, असा विश्वास त्या व्यक्त करतात. सध्या ऐतिहासिक आणि चरित्रपटांचा काळ सुरू आहे त्यामुळे प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम, महादेवी वर्मा आणि राजकीय व्यक्तिमत्त्वं इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू यांच्या भूमिका साकारायला आवडतील, असं त्या आवर्जून सांगतात. पुढे जाऊ न दिग्दर्शन, लेखनापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष देणार आहे, असं म्हणत त्यांनी मनमोकळ्या गप्पा आटोपत्या घेतल्या.

जास्तीत जास्त प्रमाणात महिला दिग्दर्शन किंवा लेखन करतील तर कथेमध्ये नवा दृष्टिकोन येईल. कारण त्या ज्या प्रकारे एखाद्या गोष्टीकडे किंवा परिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. नातेसंबंधांकडेही त्या वेगळ्या बाजूने पाहतील. त्यामुळे स्त्रिया दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रात अधिक मोठय़ा संख्येने आल्या तर गोष्ट मांडण्याची शैली बदलेल. ती अधिक रसपूर्ण होईल.  – नीना गुप्ता