अभिनेते ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली होती. फक्त भारतच नाही तर जगभरात ऋषि कपूर यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ऋषी कपूर यांनी वडिलांच्या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.

ऋषी कपूर यांचा जन्म १९५२ साली मुंबईमध्ये झाला. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात वडिल राज कपूर यांच्या चित्रपटात काम करत केली होती. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटातील भूमिकेनंतर ऋषी कपूर खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले. त्यांच्या या भूमिकेने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. त्यानंतर १९७९मध्ये त्यांनी अभिनेत्री नीतू सिंग यांच्याशी लग्न केले होते. त्यांनी एका शोमध्ये त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर बॉलिवूडमघ्ये ‘ऑल टाईम हीट’ जोडी म्हणून ओळखले जायचे. अभिनेते अनुपम खेर यांच्या टेलिव्हिजन कार्यक्रमात त्यांनी एकदा उपस्थिती लावली होती. कार्यक्रमात दोघांनीही त्यांच्या जीवन प्रवासातील विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला होता. ऋषी कपूर यांनी आपल्या प्रेमकहाणीचे गुपीत देखील सांगितली होती. आपल्या प्रेमकाहाणीच्या आठवणींना उजाळा देताना ऋषी कपूर यांनी ‘जेहरीला इन्सान’ या ७० च्या दशकातील चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीच्या काही घटना ताज्या केल्या होत्या. नितूशी झालेली भेट, भेटीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झालेले रुपांतर हा संपूर्ण प्रवास ऋषि कपूर यांनी कार्यक्रमात सविस्तर उलघडून सांगितला होता.

मला आठवते त्यावेळी माझे माझ्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते. मी भरपूर दु:खी होतो. तिला पुन्हा मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी नीतू मला माझ्या प्रेयसीला पत्र लिहीण्यासाठी मदत देखील करत होती. तेव्हा मी आणि नीतू ‘जेहरीला इन्सान’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने एकत्र होतो. पण, नंतर जस जसा वेळ पुढे गेला मी नीतूला मिस करत असल्याची जाणीव होऊ लागली. युरोपमध्ये चित्रीकरणात व्यस्त असताना नीतूच्या आठवणीने मी तिला तेथून पत्र लिहीले. ‘मला तूझी आठवण येतेय’ एवढंच पत्रात लिहीले होते आणि या पत्रापासूनच आमच्या प्रेमकहाणीचा पहिला अध्याय सुरू झाला, असे ऋषी कपूर यांनी खेर यांच्या ‘दी अनुपम खेर शो- कुछ भी हो सकता है’ या कार्यक्रमात सांगितले होते.