बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या ऑनस्क्रीन केमेस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन केमेस्ट्रीदेखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर होती. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू सिंह बऱ्याच वेळा त्यांच्या आठवणी शेअर करताना दिसतात. नीतू यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी एका चित्रपटाच्या वेळी त्यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे.

नीतू यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऋषी कपूर यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ‘झूठा ही सही’ चित्रपटातील ‘जीवन के हर मोड पे’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना ऋषी कपूर दिसत आहेत. त्यानंतर नीतू यांनी काही दिवसांपूर्वी इंडियन आयडलच्या सेटवर देखील तोच किस्सा सांगितला होता हे दाखवण्यात आले आहे.

‘आम्ही गाण्यामध्ये डान्स करताना आणि आनंदी असल्याचे दिसत आहोत. पण त्यावेळी आमचा ब्रेकअप झाला होता. मी मेकअप रुममध्ये एकीकडे रडत होते आणि दुसरीकडे डॉक्टर मला इंजेक्शन देत होते’ असे नीतू बोलताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये ऋषी कपूर एका जुन्या कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत तर नीतू कपूर काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘इंडियन आयडल १२’मधील एका भागामध्ये बोलताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करत नीतू यांनी ‘आम्ही दोघांनी एकच किस्सा वेगवेगळ्या ठिकाणी सांगितला आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी १९८०मध्ये लग्न केले होते. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. २२ जानेवारी रोजी ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नाला ४१ वर्षे पूर्ण झाली होती. त्या दिवशी देखील नीतू यांनी ऋषी कपूर यांच्या सोबतचा एक खास व्हिडीओ शेअर जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.