घोटाळ्यांमुळे प्रसिद्धीस आलेले आणि बँकांचे पैसे बुडवून परदेशात फरार झालेल्या भारतातील काही कर्जबुडव्या बड्या उद्योजकांच्या आयुष्यावरील वादात सापडलेला माहितीपट (डॉक्युसीरिज) ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या सीरिजचे पहिले तीन भाग नेटफ्लिक्सवर रिलीज झाले असून, त्याच्या प्रदर्शनाला सहाराचे सुब्रतो रॉय, बी रामलिंगा राजू, मेहुल चोक्सी यांनी विरोध केला होता.

‘नेटफ्लिक्स’वर या सीरिजबाबत म्हटलंय की, हा संशोधनात्मक माहितीपट पैशाची हाव, फसवणूक आणि भ्रष्टाचार यातून साम्राज्य उभं करणारे आणि नंतर हेच साम्राज्य संपुष्टात आलेल्या भारतातील कुप्रसिद्ध उद्योजकांवर आधारित आहे.

सीरिजचे पहिले तीन भाग चोक्सीचा भाचा आणि पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी, सहारा ग्रुपचा सुब्रतो रॉय, एसबीआयला ९ हजार कोटींचा चुना लाऊन फरार झालेला किंगफिशर एअरलाइन्सचा चेअरमन विजय मल्ल्या यांच्या भ्रष्टाचारावर आधारित आहे.

तर ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ सीरिजचा चौथा भाग हा सत्यम घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी रामलिंगा राजू याच्या घोटाळ्यावर आधारित आहे. पण हैदराबादमधील न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा एपिसोड अद्याप प्रदर्शित झालेला नाही..

बिहारमधील स्थानिक अरारिया कोर्टाने ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ या वेबसीरिजच्या प्रदर्शनावर तात्पुरती स्थगिती दिली होती. या कोर्टात सहारा उद्योगाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी वेबसीरिजच्या स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती. तसेच पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याने देखील दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करुन वेबसीरिज प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र दिल्ली हायकोर्टाने मेहुल चोक्सीची याचिका फेटाळून लावली.