डिजीटल माध्यमाचं जाळं दिवसेंदिवस वाढत आहे आणि ‘नेटफ्लिक्स’, ‘अॅमेझॉन प्राइम’ यांसारख्या प्लॅटफॉर्म्सची मागणीसुद्धा दिवसागणिक वाढत आहे. डिजीटल विश्वातील प्रेक्षकांची वाढती संख्या लक्षात घेऊनच आता नेटफ्लिक्सने पहिला ओरिजीनल मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेटफ्लिक्ससोबतच बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधू चोप्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘फायरब्रँड’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आधुनिक समाजातील नातेसंबंध आणि त्यातील गुंतागुंत यावर हा चित्रपट भाष्य करतो. जगभरातील तब्बल १ कोटी ३९ लाख नेटफ्लिक्स सदस्य हा चित्रपट पाहू शकतील. येत्या २२ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर ‘फायरब्रँड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अरुणा राजे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये उषा जाधव, गिरीष कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका आहेत.