सिद्धूला शोमधून काढणं हा समस्येवर उपाय नाही असं म्हणणाऱ्या कपिललादेखील नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. सिद्धूची पाठराखण करणाऱ्या कपिलवरदेखील बंदी घालावी अशी मागणी सोशल मीडियावर आता जोर धरू लागली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानची पाठराखण केली होती. त्यांच्या प्रतिक्रियेविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या सर्व वादानंतर सिद्धू यांची ‘द कपिल शर्मा’ शोमधून गच्छंती करण्यात आली होती.

तर सिद्धूला शोमधून काढून टाकणं किंवा कलाकारांवर बंदी घालणं हा कोणत्याही समस्येवर उपाय ठरू शकत नाही असं म्हणत कपिलनं सिद्धू यांची बाजू घेतली होती. मात्र या वक्तव्यानंतर कपिल शर्मादेखील वादात सापडला आहे. सिद्धू यांना पाठीशी घालून कपिलनं पुलवामा हल्ल्यातील शहीदांचा अपमान केला आहे असा आरोप नेटकऱ्यांचा आहे. त्यामुळे आता कपिल शर्मावर देखील बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू आहे. #BoycottKapilSharma हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

मानसिक ताण, सहकाऱ्यांशी झालेले वाद या सर्वांमुळे कपिल वर्षभरापासून मनोरंजन विश्वापासून पूर्णपणे लांब गेला होता. डिसेंबर २०१८ मध्ये त्यानं छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. छोट्या पडद्यावर परतून अवघे दोन महिनेही पूर्ण होत नाही तोच कपिलविरोधात नेटकरी एकत्र आले आहे. आता या वादावर कपिल आपली काय बाजू मांडतो हे पाहण्यासारखं ठरेल.