अडल्ट स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा अभिनेत्री सनी लिओनीचा प्रवास सध्या ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण, या वेब सीरिजने सुरुवातीपासूनच शीख समुदायाचा रोष ओढावल्याचं पाहायला मिळत आहे. शीख समुदायातील अनेकांनीच या वेब सीरिजच्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अकाली दलाचे सदस्य मनजिंदर सिरसा यांनीही या वेब सीरिजच्या नावातून ‘कौर’ हटवण्याची मागणी केली.

‘ती खासगी आयुष्यात काय काम करते, याच्याशी आम्हाला काहीच देणंघेणं नाही. तो सर्वस्वी तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. तिने फक्त या वेब सीरिजच्या नावातून कौर वगळावं अशीच आमची मागणी आगे. कारण जर तिने स्वत:च काही काळापूर्वी तिच्या नावातून कौर हटवलं होतं, तर आता त्याचा वापर का केला जातोय. आम्ही एस्सेल समुहाच्या अध्यक्षांकडे म्हणजेच सुभाष चंद्रा यांच्याकडे याविषयीची मागणी केली आहे’, असं ते ‘एएनाय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हणाले. सनीच्या या बायोपिकपर वेब सीरिजवर सध्या होणारे हे आरोप आणि त्याच्या नावात बदल करण्यासाठी होणाऱ्या मागण्या हे सर्व पाहता सोशल मीडियावर अनेकांनीच हा मुद्दा उचलून धरल्याचं पाहायला मिळालं.

यो यो हनी सिंग त्याच्या कलेच्या माध्यमातून तो ‘नेमकं’ काय सादर करतो याकडे लक्ष वेधत, त्याच्या नावातही सिंग या शब्दाचा वापर केला जातोच. तर मग सनीच्या बायोपिकमध्ये कौर वापरलं जाण्यात गैर काय, फक्त तिचा संबंध पॉर्नशी जोडला गेलाय म्हणून …? असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला. तर, ‘नको त्या कामांसाठी सुखवींदर कौरची ‘राधे माँ’ झाली आणि गुरमीरत सिंगचा ‘बाबा राम रहिम’ झाला तेव्हा त्यावर कोणीच आक्षेप घेतला नव्हता. तर मग आता सनीच्या खऱ्याखुऱ्या नावाच्याच वापरावरुन हा सर्व गोँधळ का? करनजीत कौर, या नावात काय वावगं आहे, मुळात सनीने कोणता गुन्हा नाही केला आहे’, असं म्हणत एका युजरने ट्विट केलं.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

सनीच्या बायोपिकच्या नावाचा हा मुद्दा थेट जरनेलसिंग भिंदरवाले यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला. अनेकांनीच सनीच्या या बायोपिकच्या नावाला पसंती देत तिला साथ दिल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता हा सर्व वाद पुढे नेमकं कोणतं वळण घेणार आणि येत्या काळात अकाली दलाचा या बायोपिकला होणारा विरोध शमणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.