नुकताच चित्रपटसृष्टीमधील सर्वोच्च मानला जाणारा ऑस्कर सोहळा पार पडला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात दक्षिण कोरियन चित्रपट ‘पॅरासाइट’ या चित्रपटाने छाप उमटवली. या चित्रपटाला बेस्ट चित्रपट, बेस्ट दिग्दर्शन, बेस्ट फॉरेन फिल्म आणि बेस्ट स्क्रीनप्ले या चार पुरस्कांनी गौरवण्यात आले. पण या चित्रपटाची कथा तामिळ अभिनेता विजयच्या चित्रपटातून चोरल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे.

‘पॅरासाइट’ या चित्रपटाची कथा तामिळ अभिनेता विजयच्या ‘मिनसारा कन्ना’ चित्रपटातून घेतली असल्याचे म्हटले जात आहे. ‘पॅरासाईट’ या चित्रपटात एका गरीब कुटुंबामधील सदस्य श्रीमंत घरामध्ये थोडे फार पैसे कमावण्यासाठी काम करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. शिवाय या श्रीमंत घरातील लोकांना त्यांच्याकडे काम करणारे सर्वच लोक एका कुटुंबातील आहेत हे माहिती नसते.

अभिनेता विजयचा ‘मिनसारा कन्ना’ हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मोनिका कास्चेलिनो, रम्भा आणि खुशबू सुंदर हे मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात कन्नन (विजय) इश्वर्याच्या (मोनिका कास्टेनिया) प्रेमात पडतो. पण इश्वर्या एका श्रीमंत घरातील मुलगी असते. कन्नन त्याची ओळख लपवून तिच्या कुटुंबामध्ये बॉडीगार्डचे काम करु लागतो. त्यानंतर कन्ननचा छोटा भाऊ त्याच घरात नोकराचे काम करतो आणि त्याची बहिण कुकचे काम करत असते. त्यामुळे एकाच गरीब कुटुंबातील तीन व्यक्ती श्रीमंत घरात काम करु लागतात. याच आधारावर अभिनेता विजयच्या चाहत्यांनी ‘पॅरासाईट’ चित्रपटाची कथा या चित्रपटातून चोरल्याचा दावा सोशल मीडियावर केला आहे.

‘पॅरासाइट’ चित्रपटाची कथा ‘मिनसारा कन्ना’ चित्रपटातून घेतल्याचा दावा करण्यात आला असला तरी दोन्ही चित्रपटाची कथा ही वेगळी आहे. ‘मिनसारा कन्ना’ चित्रपटात एका श्रीमंत घराण्यातील मुलगी आणि गरीब कुटुंबातील मुलगा यांची प्रेम कथा दाखवण्यात आली आहे. तर दुसरीकडे ‘पॅरासाइट’ चित्रपटात श्रीमंत आणि गरीब कुटुंबातील दरी दाखवण्यात आली आहे. तसेच गरीब कुटुंबावर ओढवणाऱ्या परिस्थिती चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.