शाहिद कपूर व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ बॉक्स ऑफीसवर तुफान गाजत असला तरी या चित्रपटाला विरोध करणारेही आहेत. एकीकडे काहींनी शाहिदच्या दमदार अभिनयाची स्तुती केली तर दुसरीकडे शाहिदच्या आक्रमक भूमिकेवर काहींनी आक्षेप घेतला आहे. विरोध करणाऱ्यांमध्ये सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या वाणी त्रिपाठी यांचाही समावेश आहे.

‘कबीर सिंग हा भयानक महिलाद्वेषी व हिंसक चित्रपट आहे. अर्जुन रेड्डी हा अत्यंत वाईट चित्रपट होता आणि आता त्यात कबीर सिंगची भर पडली आहे. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट चांगली कमाई करतोय हे पाहून आश्चर्य वाटतंय,’ असं ट्विट वाणी यांनी केलं आहे. वाणी यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. चित्रपट आवडला नाही किंवा त्यातील दृश्ये पटली नाहीत तर सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या असूनसुद्धा प्रमाणपत्र देताना का नाही आक्षेप घेतला असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. तर काहींनी ‘वीरे दी वेडिंग हा चित्रपट चालतो तर कबीर सिंग का नाही,’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर ‘सेन्सॉर बोर्ड म्हणजे चित्रपटावर बंदी आणणं इतकंच काम नाही. माझी वैयक्तिक मतं असू शकतात,’ असं उत्तर वाणी यांनी ट्रोलर्सना दिलं आहे.

शाहिदने या चित्रपटात ऑर्थोपेडिक सर्जनची भूमिका साकारली आहे. तो अत्यंत तापट स्वभावाचा असतो. एखाद्या गोष्टीमुळे राग आलाच तर त्याला कारणीभूत असणाऱ्याला बेदम मारून राग काढणारा कबीर (शाहिद कपूर) महाविद्यालयात आलेल्या प्रीती (कियारा अडवाणी) नामक तरुणीला पाहताक्षणी प्रेमात पडतो. सगळ्या गोष्टी आपल्याच पद्धतीने जगू पाहणारा, प्रसंगी ताळतंत्र सोडणारा कबीर त्याच्या याच स्वभावामुळे एका क्षणी प्रीतीला हरवून बसतो आणि मग तो नशेच्या विळख्यात अडकत जातो, ही या चित्रपटाची सर्वसामान्य कथा आहे. या चित्रपटाने पाच दिवसांत कमाईचा १०० कोटींचा आकडा पार केला आहे.