जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांना बॉलीवूडमध्ये ‘हिरो’ आणि ‘हिरॉईन’ म्हणून ‘हिरो’ या चित्रपटाने मोठे नाव मिळवून दिले. हा चित्रपट आणि त्यातील गाणी खूप गाजली. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या या ‘हिरो’चा पुढचा भाग आता लवकरच प्रदर्शित होत आहे. मात्र त्यात आता जॅकी आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्याऐवजी त्या ‘हिरो’सारखे दोन नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
सुभाष घई यांच्या ‘हिरो’ने जॅकी श्रॉफ व मीनाक्षी शेषाद्री यांना बॉलीवूडच्या मोठय़ा पडद्यावर ‘लॉन्च’केले गेले. आता सलमान खानच्या निर्मिती संस्थेतर्फे तयार करण्यात येत असलेल्या ‘हिरो’मधूनही दोन नवे चेहरे मोठय़ा पडद्यावर पदार्पण करत आहेत. या चेहऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे बॉलीवूडमधील अभिनेत्यांची ही मुले आहेत. अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरज आणि अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आथिया ‘हिरो’चे नायक-नायिका आहेत. निखिल अडवाणी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरचे मुंबईत एका कार्यक्रमात नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या वेळेस बॉलीवूडमधील अनेक मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूरजबरोबर चित्रपटात आदित्य पांचोलीचीही भूमिका आहे.
सलमान खान प्रॉडक्शनतर्फे अर्थात सलमानने या ‘हिरो’चे पोस्टर ‘ट्विटर’वर शेअर केले आहे. जॅकी आणि मीनाक्षीचा तो ‘हिरो’ १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील ‘डिंग डाँग’, ‘तू मेरा हिरो है’, ‘लंबी जुदाई’, ‘प्यार करनेवाले’ ही गाणी तेव्हा खूप लोकप्रिय झाली होती आणि आजही आहेत. या ‘हिरो’चे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे होते. नव्या ‘हिरो’ची आताच्या युवा पिढीवर काही जादू होते का? याबाबत बॉलीवूडमध्येही उत्सुकता आहे.