करोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला होता.त्यामुळे या काळात कलाविश्वातील कामकाजही ठप्प झालं होतं. मात्र तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा कलाविश्वातील कामकाज सुरु झालं असून अनेक मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरण सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या काळात एका मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

अभिनेता प्रथमेश परब याची मुख्य भूमिका असलेल्या डॉक्टर डॉक्टर या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. आखून दिलेले नियम आणि अटी यांचं पालन करत या चित्रपटातील एक अखेरचं राहिलेलं गाणं नुकतंच चित्रीत झालं आहे. त्यामुळे आता हा संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाउनच्या अटी शिथील केल्यानंतर चित्रपटाच्या टीमने अपूर्ण राहिलेल्या गाण्याचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. त्यामुळे डॉक्टर डॉक्टर या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

प्रितम पाटील दिग्दर्शित या चित्रपटातून पहिल्यांदाच एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती सागर पाठक, सूरज दगडे-पाटील, किरण कुमावत यांनी केली आहे. तसंच अमोल कागणे यांनीदेखील सहयोगी निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे.

दरम्यान, या चित्रपटात अमोल कागणे झळकणार असून त्यांच्याव्यतिरिक्त अभिनेता प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, विद्यान माने मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.