‘समांतर’ या गाजलेल्या वेब सीरिजनंतर याचा पुढील भाग म्हणजेच ‘समांतर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजच्या चित्रीकरणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. सध्या या सीरिजचं पाचगणीमध्ये चित्रीकरण सुरु आहे.
‘समांतर 2’ या नव्या सीरिजमध्ये बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टींचा भरणा करण्यात आला असून यात स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. सध्या या सीरिजचं पाचगणीमध्ये चित्रीकरण सुरु असून या सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. ‘समांतर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून ‘जीसिम्स’ने वेब विश्वात पदार्पण केले आहे.
दरम्यान, समांतर या पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते. तर, ‘समांतर 2’ चं दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत. स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघेही त्यांनी साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी घराघरात ओळखले जातात. नितीश यांनी बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये (१९८८) कृष्णाची भूमिका साकारली होती तर स्वप्निल जोशींनी रामानंद सागर यांच्या ‘कृष्ण’ (१९९३) मालिकेत ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या दोघांची मालिका म्हणूनही ‘समांतर’बद्दल रसिकांमध्ये कुतूहल आहे.