निलेश अडसूळ

नाटकातल्या मंडळींच्या सहवासात आलो की किस्से ऐकताना दिवसही अपुरा पडतो. कारण कलाकार, प्रेक्षक, तंत्रज्ञाच्या जीवनात नाना गमतीजमती क्षणाक्षणाला घडत असतात. त्यामुळे नाटक आणि किस्से हा कधीही न संपणारा विषय आहे. कलाकारांच्या शिदोरीला करोनापूर्वीच्या असंख्य आठवणी आहेत, पण शिथिलीकारणानंतर नव्याने सुरू झालेले नाटक आणि तालमी नवे किस्से आणि अनुभव देऊन जात आहेत. याच अनुभवांची ही शब्दावळ..

‘हरवलेले बरेच काही गवसले’

नाटक प्रेक्षकांसमोर येऊन प्रतिसाद मिळणे ही परीक्षा असते. ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ हे नाटक येऊन प्रेक्षकांची पसंतीही मिळाली आणि नाटक थांबले. आता नऊ महिन्यांनी पुन्हा नाटक सज्ज करताना नाटकातल्या संहितेचा, प्रत्येक जागेचा पुन्हा अभ्यास करावा लागतो आहे आणि ते करताना मजा येते आहे. प्रत्येक तालीम नवीन काही तरी शिकवते आहे. नाटक पुन्हा सुरू झाले आणि आम्ही मोकळा श्वास घेतला. नुकत्याच महाड येथे झालेल्या प्रयोगानंतर एक बाई आल्या आणि म्हणाल्या, ‘हरवलेला प्रेक्षक पुन्हा येणार हा हरवलेल्या पत्त्यांचा बंगला पाहून’. या प्रतिक्रियेने भरपूर ऊर्जा मिळाली. सद्य:स्थितीबाबत लोकांच्या मनात असलेली नकारात्मकता नाटकाच्या निमित्ताने बाहेर पडते आहे. प्रेक्षकांना आशेचा किरण दिसतो आहे. त्यामुळे करोनानंतर प्रेक्षक आणि आम्हालाही हरवलेले बरेच काही गवसते आहे. यासारखी सुंदर गोष्ट नाही.

प्रतीक्षा लोणकर, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला

मुखपट्टीपलीकडची ओळख

नाटक पुन्हा सुरू करताना तालीम होणे गरजेचे असल्याने भेट ठरली, पण तालमीला येताना सगळे मुखपट्टी घालून आले होते आणि मुखपट्टी घालूनच वाचन सुरू केले. अशाने वाचन होणार नाही हे लक्षात आले, म्हणून मुखपट्टी काढून वाचन केले. आता रंगीत तालीम होताना बॅक स्टेजवाले, मेकप दादा सगळे आले, पण मुखपट्टी आणि पीपीई किटमुळे त्यांना ओळखणे कठीण जात होते. त्यामुळे प्रत्येकाला मुखपट्टी खाली करून ओळख दाखवावी लागते आहे. तालमी सुरू होण्यापूर्वीच आम्हाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेरणा दिली. कारण ‘व्हॅक्युम क्लीनर’ या आमच्या नाटकाची जाहिरात ही करोनानंतरची पहिली जाहिरात होती. ती आली आणि कलाकार, प्रेक्षकांनी आनंद साजरा केला. त्याच प्रतिक्रियेने आम्ही जिवंत आहोत याची जाणीव करून दिली. फक्त नाटकानंतर भेटीसाठी येणाऱ्या प्रेक्षकांची कायम कमतरता भासेल.

निर्मिती सावंत, व्हॅक्युम क्लीनर

‘प्रेक्षकांच्या संवादाची गंमत’

‘आमने सामने’ हे नाटक प्रेक्षकांशी संवाद साधत पुढे जाते. ‘खरं सांगा, तुमचे हे घरात मदत करतात का हो?’, हा माझा महिलावर्गाला ठरलेला प्रश्न असतो. या प्रश्नावर करोनापूर्वी ‘नाही’ असा एकमताने जयघोष व्हायचा, पण करोनानंतर आता ‘हो’ असे उत्तर मिळते आहे. त्यावरही आम्ही म्हणतो, ‘टाळेबंदीमध्ये नाही हो. तेव्हा पर्यायच नव्हता. आता काय’ मग पुन्हा ‘नाही’ असा आवाज होतो आणि नाटय़गृहात हास्याची खसखस पिकते. आता लोकांच्या प्रतिक्रियाही बदलत आहेत आणि पर्यायाने त्यावरची आमची वाक्येही आम्हाला बदलावी लागली आहेत. नाटकाची सुरुवात करताना मी ‘अरे, आलात तुम्ही.. आठ-नऊ महिन्यांनी पाहिलं तुम्हाला’ या साध्या वाक्यावरही लोक तुफान दाद देतात. याचसाठी आपण आसुसले होतो का असा विचार या वेळी मनात येतो. किंबहुना आम्ही मुद्दाम प्रेक्षकांना सांगतो, ‘आता मुखपट्टी घालून बसले आहात तर नेहमीपेक्षा मोठय़ाने हसा. नाही तर फक्त खांदे हलताना दिसतील..’ आणि प्रेक्षक हसू लागतात. लोक येतात, हसतात, आनंद घेतात, भरभरून प्रेम देतात, याचे समाधान वाटते.

लीना भागवत, आमने सामने

५० टक्के उपस्थिती, १०० टक्के प्रतिसाद

सुदैवाने ‘सही रे सही’ या नाटकाला आजही हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतो आहे. ‘करोना’ नावाची भीती फक्त नाटय़गृहात येऊन रुळेपर्यंतच प्रेक्षकांच्या आणि आमच्या मनावर असते. तिसऱ्या घंटेनंतर एकदा नाटक सुरू झाले की दोन तास करोना वगैरे जगात काही आहे याचाच विसर पडतो. प्रयोगानंतर प्रेक्षकांशी संवाद साधताना मी आवर्जून एक वाक्य वापरतो, ‘उपस्थिती ५० टक्के आहे, पण तुमच्याकडून येणारा प्रतिसाद मात्र १०० टक्के आहे.’ गेली अनेक वर्षे नाटक करतो आहे, पण प्रयोगानंतर शेवटचा माणूस भेटेपर्यंत मी घरी जात नाही. माझा दीड तास त्यासाठी ठरलेला असतो. पण आता मात्र इच्छा नसताना, प्रेक्षकांना भेटायला येऊ नका, अशी विनंती करावी लागते. प्रेक्षकही याला सकारात्मक दाद देतात. गेले काही महिने लोक वैतागले आहेत. चांगले शब्द त्यांच्या कानावरच पडलेले नाहीत. त्यामुळे नाटक पाहिल्यावर ते भारावून जात आहेत.

भरत जाधव, सही रे सही

सुखद अनुभव

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे शिथिलीकरणानंतरचे पहिले नाटक होते. त्यामुळे प्रेक्षक येतील का, प्रतिसाद मिळेल का, अशी भीती होतीच.  पुण्यात पहिल्या प्रयोगाची तिकीट विक्री सकाळी ९ ला सुरू होणार होती. इतक्या सकाळी कोण येणार, याचे प्रचंड दडपण आले होते. पण सकाळी ७ वाजता पहिला प्रेक्षक आला हे पाहून आम्ही थक्क झालो. हा पहिला अनुभवच सुखद होता. त्याच रांगेतला एक प्रेक्षक येऊन म्हणाला, ‘हा पुण्यातला प्रयोग आहे. पन्नास टक्के उपस्थिती असली तरी दाद शंभर टक्के मिळेल.’ या वाक्याने आम्हा सर्वानाच आत्मविश्वास मिळाला. विशेष म्हणजे या नाटकात माझ्या प्रवेशानंतर मी लहान मूल हेरून माझी वाक्ये म्हणते. पण आता लहान मुलं प्रयोगाला येणे शक्य नाही असे गृहीत धरून मी माझी वाक्ये बदलली आणि प्रवेश घेतल्यानंतर माझ्या लक्षात आले की, नाटकाला लहान मुलेही आली आहेत. तर दुसरीकडे वयस्कर मंडळीही होती. अशा काळात दोन्ही पिढय़ा नाटकाला येणे हेही आनंद देणारे होते.

कविता लाड, एका लग्नाची पुढची गोष्ट

कवितेची फर्माईश

टाळेबंदीत कविता करणे आणि समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम सातत्याने सुरू होते. याला प्रतिसादही भरपूर मिळाला. संकर्षण म्हणजे कविता अशीही ओळख आता लोकांमध्ये होऊ लागल्याने परवा प्रयोगानंतर प्रेक्षकांनी घरी जाण्याऐवजी चक्क कवितांची मागणी केली. त्यात नाटय़गृह तुडुंब भरलेले असल्याने आता काय करायचे हेही कळेना. त्या वेळी ‘अहो अख्खं नाटक मी लिहिलंय, तुमचं पोट नाही भरलं का’, असे चेष्टेने म्हणत मी वेळ मारून नेली. पण एक एक करून सर्वच प्रेक्षकांनी कवितेचा रेटा धरला. मग रंगभूमीवर लिहिलेलीच एक कविता मी सादर केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. शिथिलीकरणानंतरही प्रेक्षकांचे प्रेम तसेच आहे, किंबहुना ते वाढले आहे.

संकर्षण कऱ्हाडे, तू म्हणशील तसं

शिस्तबद्ध सारे..

करोनाने नाटय़गृहातील वातावरण शिस्तबद्ध केले हाही बदल आपण विचारात घ्यायला हवा. रंगमंचावरही ही शिस्त पाळली जाते. आपल्याला दिलेल्या कामाव्यतिरिक्त कुणीही कुठेही जात नाही, किंवा एकमेकांमध्ये मिसळत नाही. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर, पूर्वी गर्दी टाळण्यासाठी नाटकाला येताना मागच्या दाराने येणे आणि मागच्याच दाराने जाणे, असाच क्रम ठरलेला होता. पण आता मुखपट्टीमुळे कलाकारांना सहज कुणी ओळखत नाही. त्यामुळे प्रेक्षकांमधून येणे, तिकीट बारीवर उभे राहणे, तिकिटासाठीच्या रांगा अनुभवणे याचा आनंद घेता येतो आहे. गंमत म्हणजे कधी तरी मुखपट्टी घालूनच रंगमंचावर प्रवेश घेऊ की काय, अशीही भीती असते. त्यामुळे बॅक स्टेजचे कलाकार आमच्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. ज्याचा प्रवेश जवळ येईल, त्याला ‘मुखपट्टी काढून प्रवेश घेणे’, अशा सूचना आवर्जून दिल्या जातात.

सागर कारंडे, इशारो इशारो मे

नाटक नव्याने उलगडले

सध्या सुरू असलेले नाटक ‘न्यू नॉर्मल’ आहे. म्हणजे हे ‘नॉर्मल’ नाही, ज्यात सगळेच पूर्वीसारखे नाही. यातला सर्वात मोठा बदल होता तो म्हणजे ऑनलाइन माध्यमातून तालमी होणे. नाटकात आधी असे होईल याचा विचारही केला नव्हता, पण ते झाले. नऊ महिन्यांनी पुन्हा वाचन, पुन्हा तालीम यामुळे नाटकाचा पुन्हा अभ्यास करावा लागला. यात नाटक नव्याने उलगडत गेले. कारण करोनाकाळात बरेच बदल झाले, सभोवतालचे वातावरण बदलले, घटना बदलल्या, माणूस म्हणून आम्ही बदललो. त्यामुळे प्रत्येक वाक्याचा नव्याने अर्थ लागतो आहे. एखाद्या नाटकाचा पहिला प्रयोग असावा तितकीच उत्सुकता आणि ऊर्जा आहे. नाटकाच्या संहितेतली बरीच वाक्ये विसरलो होतो, काही वाक्यांवर आम्हीच हसत होतो, प्रेक्षक इथे कसा प्रतिसाद द्यायचे याच्याही आठवणी जाग्या झाल्या. त्यामुळे हा अनुभव कायम लक्षात राहणारा आहे.

उमेश कामत, दादा, एक गुड न्यूज आहे