स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर मंदार कुरुंदकर दिग्दर्शित ‘वन्स अ ईअर’ ही मराठी ओरिजनल्स वेब सीरिज सुरु झाली असून या वेब सीरिजला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या वेब सीरिजमध्ये त्यांच्या सहा वर्षांच्या नात्यात प्रत्येक टप्प्यावर आलेले वेगळे वळण दाखवण्यात आले आहे. बराच काळ अभिनयापासून दूर राहिलेला निपुण या वेबसिरीजच्या निमित्ताने आपल्या समोर येत आहे. यात निपुणचा अठरा ते तेवीस वर्षांपर्यंतचा प्रवास दाखवला असून त्याचे सहा वेगळे लूक्स यात आपल्याला पाहायला मिळतील.

या लूक्सबाबतचाच एक मजेदार किस्सा निपुणने शेअर केला आहे. तो म्हणतो, ” या सहा वर्षांच्या कालावधीत माझे सहा वेगळे लूक्स दाखवण्यात आले आहेत. शिवाय ते नैसर्गिक दिसणेही तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे शूटिंगचे शेड्युलही तसेच केले होते. आधी दाढी, मग मिशी आणि शेवटी तुकतुकीत दाढी (क्लीन शेव्ह) अशा क्रमाने चित्रीकरण करण्यात आले. ज्यावेळी माझा शेवटचा लूक केला तेव्हा मी स्वतःला बघून घाबरलोच. कारण बऱ्याच काळात मी स्वतःला असे बघितले नव्हते. त्यामुळे मलाच एक भीती होती मी स्क्रीनवर कसा दिसेन? मात्र मंदारला माझा हाच लूक हवा होता.

या भूमिकेसाठी शारीरिक बदल कसे केले याबद्दल तो पुढे सांगतो, ”या भूमिकेसाठी मी वजनही कमी केले. विशेष म्हणजे या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मी एकदाही वजन तपासले नाही. माझे आठ- दहा वर्षांपूर्वीचे काही कपडे मी ठेवले होते. जे मला आता व्हायला लागले, यावरून मला कळले, की माझे वजन कमी झाले आणि आवर्जून सांगावी अशी एक गोष्ट म्हणजे या काळात मला हे सुद्धा नव्याने कळले, की माझ्या बायकोला डाएटचे पदार्थ इतके छान बनावता येतात.”

सहा भागांची ‘वन्स अ ईअर’ ही वेब सीरिज एमएक्स प्लेयरवर प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येईल.