रामायण आणि महाभारत या दोन मालिका ८० आणि ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय होत्या. या मालिका सुरु झाल्या की सगळ्या रस्त्यांवर शुकशुकाट असायचा. आता २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला असताना प्रशासनाने रामायण आणि महाभारत मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. नुकताच महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने तेव्हा महाभारत पाहण्यासाठी लोकं कुठे कुठे जायची याचा खुलासा केला आहे.

महाभारतात कृष्णाची भूमिका अभिनेते नीतीश भारद्वाज यांनी साकारली होती. तेव्हा त्यांचे वय केवळ २३ वर्षे होते. नुकताच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आजच्या पिढीला यातून खूप काही शिकायला मिळणार असल्याचे नीतीश यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी एक किस्सा देखील शेअर केला आहे. ‘१९८८मध्ये जेव्हा महाभारत मालिका सुरु झाली तेव्हा सर्वांच्या घरी टीव्ही नव्हता. एका आयएएस अधिकाऱ्याने मला सांगितलं की ते एका व्यक्तीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जायचे. त्या व्यक्तीकडे दोन टीव्ही होते. एक ब्लॅक अॅण्ड व्हाइट आणि एक कलर टीव्ही. ब्लॅक अॅण्ड व्हाइट टीव्हीवर तो फ्री मालिका दाखवायचा आणि कलर टीव्हीसाठी पाच पैसे घ्यायचा. अशा प्रकारे ते अधिकारी पाच पैसे देऊन महाभारत पाहायला जायचे’ असे नीतीश यांनी सांगितले.

तर दुसरीकडे ही मालिका यूपी आणि बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. सकाळी ९ ते १०च्या दरम्यान मालिका लागायची आणि तेव्हा जर तेथील लाइट गेली तर लोकं ट्रांसफॉर्मर जाळून टाकायचे असे पुढे नीतीश यांनी सांगितले.