‘लग्नकार्यामध्ये अवास्तव खर्च करणार नाही’ असे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरने सांगितले होते. त्यानंतर तिच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सोनमने लग्नामध्ये जास्त खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला प्रियकर आनंद आहुजा आणि घरातील अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला. सोनमच्या या निर्णयाबरोबरच तिने आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ महत्वपूर्णच नाही तर पर्यावरणपूरक सुद्धा आहे.

सोनमने पर्यावरण संरक्षणासाठी आणि कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी लग्नपत्रिका न छापण्याचा निर्णय घेतला आहे. कागदाच्या पत्रिकेशिवाय ई-कार्डद्वारे पाहुण्यांना लग्नाचे आमंत्रण द्यावे असे सोनमने ठरवल्याचे ‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सोनमच्या लग्नासाठी पाहुण्यांना ई-कार्डद्वारे पत्रिका पाठवून आमंत्रित करण्यात येणार आहे.

वाचा : अवघ्या ४८तासात ‘या’ सिनेमाच्या ट्रेलरला मिळाले दोन कोटी हिट्स

दरम्यान, सोनमचे लग्न ७ किंवा ८ तारखेला वांद्र्यामधील हेरिटेज हवेली येथे होणार असल्याचे सांगण्यात आहे. तर लग्नापूर्वीचे कार्यक्रम म्हणजेचे मेहंदी, संगीत हे एकाच ठिकाणी न होता वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. यातील संगीत कार्यक्रमामध्ये नृत्य दिग्दर्शिका फराह खान कोरियोग्राफ करणार आहे.