अमेरिकी मंदीत देशोधडीला लागलेल्या नागरिकांच्या जगण्याची व्यथा चित्ररूपात मांडणाऱ्या ‘नोमॅडलॅण्ड’ चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांवर वर्चस्व राखले. मानाच्या ओळखल्या जाणाऱ्या गटांत क्लोई जाओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा, फ्रान्सिस मॅकडॉर्मंड यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून ‘नोमॅडलॅण्ड’चा गौरव करण्यात आला.

क्लोई जाओ या कॅथरिन बिगलोज यांच्यानंतर ऑस्कर मिळविणाऱ्या दुसऱ्या महिला दिग्दर्शिका ठरल्या, तर पहिल्यांदाच त्यांच्या रूपाने अश्वेतवर्णीय महिलेला हा सर्वोच्च सन्मान मिळाला. करोनामुळे यंदाचा ९३ वा ऑस्कर सोहळा दीड महिन्यांहून अधिक काळ पुढे ढकलण्यात आला. अंतर नियम तसेच सुरक्षेसाठी लॉस एंजेलिस शहरातील युुनियन स्टेशन आणि नेहमीच्या डॉल्बी थिएटर या दोन ठिकाणी यंदा पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले. फक्त नामांकन असणाऱ्या कलाकारांना कॅमेरासमोर असताना मुखपट्टी परिधान न करण्याची मुभा देण्यात आली होती.

यंदा डेव्हिड फिंचर यांच्या ‘मँक’ या चित्रपटाला सर्वाधिक दहा नामांकने होती, तर ‘नोमॅडलॅण्ड’, ‘मा रेनी’ज बिग बॉटम’, ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसिहा’. ‘साऊण्ड ऑफ मेटल’, ‘मिनारी’ आदी चित्रपटांना प्रत्येकी सहा नामांकने मिळाली होती. ब्रिटनचे ‘द फादर’ आणि ‘प्रॉमिसिंग यंग वुमन’ हेदेखील सर्वोत्कृष्ट चित्रपटासह इतर महत्त्वाच्या पुरस्कारांच्या स्पर्धेत होते. ‘मँक’ चित्रपटाला केवळ तांत्रिक गटातील पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट संकलनासाठी आणि ध्वनिमुद्रणासाठी ‘साऊण्ड ऑफ मेटल’ चित्रपटाची निवड झाली. ‘मा रेनी’ज बिग बॉटम’साठी चॅडविक बोसमन यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा मरणोत्तर पुरस्कार मिळेल, अशी अटकळ बांधली गेली होती. मात्र, सर्वोत्तम अभिनेते गटात ८४ वर्षीय सर अँथनी हॉपकिन्स यांच्या नावावर शिकामोर्तब झाले. ‘फादर’ चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. सर्वाधिक वयाच्या व्यक्तीला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळण्याचा इतिहास त्यामुळे नोंदला गेला.

मॅकडॉर्मंड यांचा तिसरा पुरस्कार…

‘फार्गो’, ‘थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड एबिंग, मिसुरी’ या चित्रपटांनंतर तिसऱ्यांदा फ्रान्सिस मॅकडॉर्मंड यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. जगभरात करोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पुन्हा आपण चित्रपटगृहाच्या गूढ आणि हव्याशा वाटणाऱ्या वातावरणात एकमेकांसह चित्रपट पाहू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

थोडे नोमॅडलॅण्डविषयी…

क्लोई जाओ या ३९ वर्षीय कोरियाई-अमेरिकी दिग्दर्शिकेने हा चित्रपट केला असून त्याची निर्मिती ही फ्रान्सिस मॅकडॉर्मंड यांची आहे. जेसिका ब्रुडर यांच्या ‘नोमॅडलँड : सव्र्हायव्हिंग अमेरिका इन द ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी’ या पुस्तकावर हा चित्रपट आधरित आहे. २००८ ते १० या काळात अमेरिकी मंदीमुळे नोकऱ्या आणि घरदार गेलेल्या अनेक लोकांना आपल्या शहरांपासून विस्थापित व्हावे लागले. या विस्थापितांच्या कहाण्या पत्रकार जेसिका ब्रुडर यांनी एकत्रित केल्या होत्या. क्लोई जाओ यांनी या सत्यकथांतून चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला आधी गोल्डन ग्लोब, क्रिटिक चॉइस अ‍ॅवॉडर््स, बॅफ्टा अ‍ॅवॉडर््र्स, इंडिपेंडंट स्पिरिट अ‍ॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.