दिग्दर्शक क्लो झाओ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नोमॅडलँड’ या चित्रपटास ‘ब्रिटिश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अ‍ॅवॉर्ड्स’ (बाफ्टा) पुरस्कारात मोठे यश मिळाले असून तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटास एकूण चार पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडरमाँड हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला असून झाओ क्लो यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सिनेमॅटोग्राफी प्रकारातही याच चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे.

झाओ क्लो या बाफ्टामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी हा पुरस्कार भटक्या जातीजमातींना अर्पण केला असून त्या लोकांनी आमच्या चित्रपट चमूला त्यांच्या जीवनात सहज प्रवेश दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी त्यांची स्वप्ने, सभ्यता यांच्या संवेदना आमच्यासमोर मांडल्या. वय वाढून येणारी अनुभवसिद्धता हीच मोठी असते हे त्यांच्या उदाहरणातून आम्हाला समजले, आपण समाजातील ज्येष्ठांना कसे वागवतो यावर समाजातील आपले स्थान ठरत असते व त्यात सुधारणा करण्याची गरज आहे, असे क्लो यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

अँथनी हॉपकिन्स यांना ‘दी फादर’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या गटात ‘दी व्हाइट टायगर्स’साठी आदर्श गौरव यांचेही नामांकन होते. हॉपकिन्स यांना आठव्यांदा नामांकन मिळाले होते त्यांनी सांगितले की, अभिनय हे माझ्या जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. मी तेच करू शकतो. त्यात मला आनंद आहे. तो माझा जगण्याचा मार्ग आहे. रूपांतरित पटकथेचा पुरस्कारही ‘दी फादर’ चित्रपटाने पटकावला आहे.

बाफ्टा पुरस्कार

* उत्कृष्ट चित्रपट- नोमॅडलँड

* उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट- प्रॉमिसिंग यंग वुमन

* उत्कृष्ट दिग्दर्शक- क्लो झाओ (नोमॅडलँड)

* उत्कृष्ट अभिनेता- अँथनी हॉपकिन्स (दी फादर)

* उत्कृष्ट अभिनेत्री- फ्रान्सेस मॅकडोरमंड (नोमॅडलँड)

* उत्कृष्ट सहायक अभिनेता- डॅनियल कालुया (जुडास अँड दी  ब्लॅक मसिहा)

* उत्कृष्ट सहायक अभिनेत्री- योन युह जुंग- (मिनारी)

* मूळ पटकथा- प्रॉमिसिंग यंग वुमन

* रुपांतरित कथा- दी फादर

* इंग्रजी भाषा बाह््य चित्रपट- अ‍ॅनदर  राउंड

* उदयोन्मुख अभिनेता पुरस्कार- बुकी बाक्री

* उत्कृष्ट माहितीपट- माय ऑक्टोपस टीचर