‘ए मामू’… संजय दत्तच्या तोंडी असलेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील हा संवाद खूप गाजला. जवळपास १६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना कायम लक्षात राहणारी मुन्नाभाईची भूमिका दिली. संजय दत्तने साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतली. ही भूमिका त्याच्यापेक्षा उत्तम कोणीच साकारली नसती असं आजही अनेकांचं मत आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची मुन्नाभाईसाठी पहिली पसंत विवेक ओबेरॉय होता.

विवेक ओबेरॉयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला. ‘राजकुमार हिरानींनी मुन्नाभाईच्या भूमिकेची ऑफर मला दिली होती. मला त्या चित्रपटात काम करण्याची इच्छा पण होती. मात्र तारखांच्या गोंधळामुळे मी त्यांना नकार दिला. कदाचित संजय दत्तच्या नशिबीच ती भूमिका होती,’ असं विवेकने सांगितलं.

विवेक आणि संजय दत्तने ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ आणि ‘झिला गाझियाबाद’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात संजय दत्त, अर्शद वारसी, बमन इराणी, सुनील दत्त आणि ग्रेसी सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. तीन वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल ‘लगे रहो मुन्नाभाई’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम सुरू आहे.

विवेकचा आगामी ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात विवेक मोदींची भूमिका साकारत आहे.