वरुण धवनच्या ‘ऑक्टोबर’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. आतापर्यंत न पाहिलेली अनोखी अव्यक्त प्रेमकहानी या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. ट्रेलरमध्ये एक अशी प्रेमकहाणी पाहायला मिळते ज्यात प्रेम कधीच नसतं. पण तरीही अचानक झालेल्या प्रेमाच्या अनुभवातून वरुणचं आयुष्यच बदलून जातं.
वरुणने याआधी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘जुडवा २’ या सिनेमांतून रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. पण ऑक्टोबरमधील त्याची भूमिका ही आतापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिकांना छेद देणारी आहे. सिनेमात त्याने डॅन या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे. जो एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिकाऊ म्हणून काम करत असतो. पण त्याला त्याचे हे काम फारसे आवडत नसते. त्यामुळे तो सतत त्रासलेलाच असतो. त्या संपूर्ण काळात शुईली (बनिता) त्याची चांगली मैत्रीण झालेली असते. पण त्यांच्यात प्रेम कधीच नसतं. शुईलीचा अपघात होतो आणि ती सर्व गोष्टी विसरते. पण जेव्हा तिला जाग येते त्यात ती सर्वातआधी डॅनचेच नाव घेते. शुईलीने त्याचेच नाव पहिले का घेतले? डॅन आणि शुईलीमध्ये खरंच प्रेम असते का? डॅनला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं त्याला मिळणार का हे पाहण्यासाठी ऑक्टोबर सिनेमा पाहावाच लागेल.
व्यक्त होणारं प्रेमच अनेकदा हृदयस्पर्शी असतं असं नाही. काही प्रेमकहाणी या अव्यक्तच असतात, ज्यांच्याबद्दल आपल्याला नेहमीच कुतुहल असतं. ऑक्टोबरचा ट्रेलर पाहतानाही हेच कुतुहल जाणवत राहतं. वरुण धवनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमाचा ट्रेलर शेअर केला. सुजित सरकार दिग्दर्शित ऑक्टोबर हा सिनेमा १३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. वरुणसोबत या सिनेमात बनिता संधूची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमातून बनिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
लंडनमध्ये राहणारी बनिता केवळ १८ वर्षांची आहे. पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांची असल्यापासून अभिनय करतेय. यापूर्वी ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. यूट्युबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. यानंतर बनिताने मागे वळून पाहिलेच नाही. सिनेमाबद्दल बोलताना सुजीत म्हणाले की, ‘पिकू’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान एकदा वृत्तपत्र वाचत असताना एका बातमीकडे माझी नजर गेली आणि मला ऑक्टोबर सिनेमाची कथा सुचली. प्रेक्षकांना या सिनेमाची कथा आवडेल अशी मला खात्री आहे.’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 2:58 pm