News Flash

पुन्हा एकदा

टीव्हीसमोर असणाऱ्या प्रेक्षकांची एक पिढी अशी आहे ज्यांना सिनेमामधली ‘अनिता राज’ माहितीच नाही. त्यांनी मालिकेतूनच आणि याच वयात आपल्याला बघितलं आहे

| August 2, 2015 01:20 am

टीव्हीसमोर असणाऱ्या प्रेक्षकांची एक पिढी अशी आहे ज्यांना सिनेमामधली ‘अनिता राज’ माहितीच नाही. त्यांनी मालिकेतूनच आणि याच वयात आपल्याला बघितलं आहे. त्यांना माझ्या मालिकांबद्दलच उत्सुकता आहे, तर दुसऱ्या पिढीने माझे चित्रपट आणि आत्ताच्या भूमिकाही माहिती आहेत. या दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांचा अनोखा प्रतिसाद आपल्याला मिळतो तेव्हा एक कलाकार म्हणून काम करत असल्याचं समाधान मिळतं
छोटय़ा पडद्यावर सध्या मालिकेची निर्मिती, कथानकापासून ते कलाकारापर्यंत सगळ्याच गोष्टी भव्यदिव्य असाव्यात म्हणून धडपड सुरू आहे. भव्य मालिकांच्या निर्मितीची जी शर्यत सुरू आहे त्यात सध्या झी टीव्हीवर सुरू झालेल्या ‘एक था राजा एक थी रानी’ या मालिकेचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. काही दशकं मागे जात १९४० च्या काळातील संस्थानिक, त्या वेळचं समाजजीवन आणि या पाश्र्वभूमीवर एका सामान्य मुलीची आणि युवराजाची प्रेमकथा असं या मालिकेचं स्वरूप आहे. ‘एक था राजा एक थी रानी’च्या या कथानकात ‘राजमाता’ ही भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे आणि ती साकारली आहे हिंदी चित्रपटसृष्टीत एके काळी ‘ग्लॅमरस’ असा किताब मिरवलेल्या अनिता राज यांनी.. हिंदीत ७२ चित्रपट नायिका म्हणून अनिता राज यांच्या नावावर आहेत, मात्र पुनरागमनासाठी त्यांनी माध्यम निवडलं ते छोटय़ा पडद्याचं. अनिल कपूरच्या ‘२४’ मालिकेत नयना सिंघानियांची डॅशिंग भूमिका केल्यानंतर पुन्हा एकदा राजमातेच्या भूमिकेत दिसणाऱ्या अनिता राज यांच्याशी मारलेल्या गप्पा..
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक जुन्या अभिनेत्री अचानकपणे ‘ग्लॅमरस मॉम’ म्हणून पडद्यावर वावरू लागल्यात. अनिता राज हे नावही त्याच मांदियाळीतलं आहे का? असं विचारल्यावर छोटा पडदा आणि मोठा पडदा हा फरक निदान आजच्या काळात तरी चुकीचाच आहे, असं त्या म्हणतात. मालिका असो किंवा चित्रपट दोन्हींकडे आम्ही कलाकार म्हणून तेवढीच मेहनत घेतो आहोत. निर्मितीच्याही दृष्टीने विचार करायचा झाला तर ही पीरिअड मालिका आहे. ५०० कामगार रोज या हवेलीच्या सेटवर काम करतात. त्या काळातील संस्थानिक, त्यांचे पोशाख, त्यांचे राहणीमान हे दाखवण्यासाठी जो कपडे-दागिने, मेकअपचा रोजचा खटाटोप आहे तोही तितकाच महागडा आहे. त्यामुळे भव्य निर्मिती, दर्जा आणि मेहनत या सगळ्यात दोन्हींची तुलना योग्य नाही, असं अनिता राज यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते फरक पडतो तो कलाकारांच्या कामामुळे. कलाकार म्हणून तुम्ही तुमची भूमिका किती चोख वठवता हे महत्त्वाचं आहे. अभिनयाच्या बाबतीत एक कलाकार म्हणून कुठलीही तडजोड मी खपवून घेत नाही. तेव्हाही चित्रपटांमध्ये काम करत असतानाही तडजोड केलेली नाही आणि आत्ताही मालिकांच्या बाबतीत नाही. बाकी माध्यमं दोन्ही तितकीच प्रभावी आहेत हे आपण मान्य करायला हवं, असा आग्रही मुद्दा त्यांनी मांडला.
अनिता राज यांना घरातून अभिनयाचा वारसा होता. त्यांचे वडील जगदीश राज हे हिंदीतील जुनेजाणते अभिनेते होते. १९८१ साली त्यांनी पहिला चित्रपट केला होता तो म्हणजे ‘प्रेमगीत’. सुदेश इस्सार दिग्दर्शित ‘प्रेमगीत’ या चित्रपटात अभिनेता राज बब्बर यांच्याबरोबर अनिता राज यांची मुख्य भूमिका होती. त्या चित्रपटापासून ते अगदी अलीकडे ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटापर्यंत ७२ चित्रपट त्यांनी केले आहेत. मी खूप वेगवेगळ्या चित्रपटांमधून काम केलं आहे. राज बब्बरपासून मिथुन, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्तसारख्या कलाकारांबरोबर काम केलं आहे; पण माझा पहिला चित्रपट ‘प्रेमगीत’ हा माझ्यासाठी सगळ्यात खास चित्रपट आहे आणि कायम राहील, असं अनिता राज यांनी सांगितलं. ‘प्रेमगीत’मधलंच ‘होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो’ हे गाणं आपल्याला आजही तितकंच आवडतं, असं त्या म्हणतात. ‘‘या चित्रपटाचे संगीतकार होते गझल गायक जगजीत सिंग. संगीतकार म्हणून तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता आणि अभिनेत्री म्हणून माझाही पहिलाच चित्रपट होता. या योगायोगामुळे मी त्यांच्याशी, या चित्रपटाशी आणि गाण्याशी कायम जोडले गेले आहे.’’ आता हिंदी चित्रपट करावेसे वाटत नाहीत का? या प्रश्नावर खरोखरच एखादी चांगली, आपल्या वयाला साजेल अशी भूमिका मिळाली तर ठीक आहे. उगीचच मिळतेय भूमिका म्हणून करायची इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिता राज यांच्या एके काळच्या सहकारी अभिनेत्री आणि अभिनेतेही वेगवेगळ्या पद्धतीने छोटय़ा पडद्याकडे वळलेले दिसतात. कोणी रिअ‍ॅलिटी शोजच्या माध्यमातून, तर कोणी मालिकांमधून महत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम करताना दिसतात. कलाकारांच्या बाबतीत असं स्थित्यंतर कायम आवश्यक आहे. एकाच साच्यात अडकून राहणं किंवा वाढत्या वयामुळे आपल्या कामाला रामराम ठोकणं आपल्याला पटत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबतीत त्या एव्हरग्रीन देव आनंद यांचा किस्सा सांगतात. माझे वडील जगदीश राज आणि देव आनंद यांच्यात गप्पा रंगायच्या. देव आनंद कायम म्हणायचे, कलाकाराचे आयुष्य हे नेहमी रंगमंचावरच व्यतीत झालं पाहिजे. मग तो चित्रपटाचा असो की थिएटरचा याने फरक पडत नाही. कलाकारांनी सतत अभिनय करत राहिलं पाहिजे, हे त्यांचं विधान आजही आपल्यासोबत आहे, असं त्या म्हणतात. आणखी एक वैशिष्टय़ त्यांना जाणवतं ते म्हणजे टीव्हीसमोर असणाऱ्या प्रेक्षकांची एक पिढी अशी आहे ज्यांना सिनेमामधली ‘अनिता राज’ माहितीच नाही. त्यांनी मालिकेतूनच आणि याच वयात आपल्याला बघितलं आहे. त्यांना माझ्या मालिकांबद्दलच उत्सुकता आहे, तर दुसऱ्या पिढीने माझे चित्रपट आणि आत्ताच्या भूमिकाही माहिती आहेत. या दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांचा अनोखा प्रतिसाद आपल्याला मिळतो तेव्हा एक कलाकार म्हणून काम करत असल्याचं समाधान मिळतं, असं अनिता राज म्हणतात. ‘एक था राजा एक थी रानी’ या मालिकेचा सेट, स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रेमकथा या दोन्ही गोष्टी भावल्यामुळे ‘राजमाता प्रियमवदा’ साकारण्याचं आव्हान आपण स्वीकारलं आहे. अमरकोटच्या संस्थानिकांचे हे काल्पनिक विश्व प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 1:20 am

Web Title: once again
Next Stories
1 कंगनाच्या पाठीवर बीगबींच्या कौतुकाची थाप
2 केतकीच्या ‘फुंतरू’ चा मुहूर्त
3 ‘ढिनच्यॅक एंटरप्राइज’मध्ये माय लेकीची जोडी
Just Now!
X