रवींद्र पाथरे

नुकतीच एक बातमी आलीय : ‘ऑप्टिमस व्हच्र्युअल थिएटर- लाइव्ह’तर्फे इंग्रजी, मराठी आणि हिंदी नाटकांचे ‘प्रत्यक्ष’ प्रयोग ऑनलाइन माध्यमातून सादर होणार आहेत. गोरेगावच्या नंदादीप शाळेतील नव्या ऑडिटोरिममध्ये हे नाटय़प्रयोग होणार असून, त्यांचे लाइव्ह प्रक्षेपण देशातील तसेच परदेशांतील नाटय़रसिकांसाठी करण्यात येणार आहे. या नाटकाच्या थिएटरमधील प्रत्यक्ष प्रयोगाला मात्र मर्यादितच प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान ‘स्नॅपशॉट्स फ्रॉम अ‍ॅन आल्बम’ या इंग्रजी नाटकाच्या प्रयोगांनी या अभिनव उपक्रमास सुरुवात होणार आहे. आठ अद्ययावत कॅमेऱ्यांनी चित्रीकरण करत हे नाटक सादर होईल. सध्याच्या करोनाकाळात आवश्यक ती सर्व खबरदारी प्रयोगाच्या वेळी घेण्यात येणार असल्याचं संबंधितांकडून सांगण्यात आलं.

तत्पूर्वी मराठी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते हृषीकेश जोशी यांनीही ‘नेटक’ संस्थेतर्फे ‘मोगरा’ या व्हच्र्युअल नाटकाचे प्रयोग सादर करून या ऑनलाइन प्रयोगांची मुहूर्तमेढ रोवलेली आहेच. करोनाकाळाचं अपत्य असलेला हा ‘प्रयोग’ (नाटकाचा तसेच एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचाही!) अनेक शक्यता पोटात घेऊन अवतरला आहे यात शंका नाही. कारण घराबाहेर न पडताही प्रेक्षकांना नाटक बघण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. त्यामुळे तांत्रिक खर्चाचा नवा घटक जरी प्रयोग सादरीकरणात आला असला तरी बाकी अनेक खर्च त्यामुळे वाचणार आहेत. मुख्य म्हणजे प्रेक्षकांना नाटकाच्या तिकिटाव्यतिरिक्त होणारा अन्य खर्च (प्रवास, खाणंपिणं आदी) वाचेल, वेळेची बचत होईल आणि करोनाच्या दहशतीची तलवारही मानेवरून हटल्याने मनमोकळ्या, प्रसन्न मन:स्थितीत नाटक पाहता येणार आहे.

यात एक प्रमुख अडचण आहे, ती निरनिराळ्या देशांतील वेगवेगळ्या टाइम झोन्सची! भारतात जेव्हा दिवस असतो तेव्हा अमेरिकेसारख्या काही देशांत रात्र असते. किंवा जपान, न्यूझीलंड वगैरे देशांची घडय़ाळं तिथल्या दिनमानानुसार आपल्यापेक्षा पाच-सहा तास पुढे असतात. अशा वेळी इथून नाटकाचा प्रयोग सादर करायचा तर त्या त्या देशांची घडय़ाळं पाहूनच प्रयोग सादर करणं भाग आहे. या सगळ्याचा सखोल अभ्यास रंगकर्मी हृषीकेश जोशी आणि त्यांच्या टीमने केला आहे आणि त्यानुसार वेगवेगळ्या देशांसाठी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी प्रयोग सादर करण्याचं तंत्र त्यांनी योजलेलं आहे. त्यामुळे काही वेळा आपल्याकडे लोकांचा सकाळचा ब्रेकफास्ट सुरू असतो तेव्हा ‘मोगरा’चे कलाकार कुठल्या तरी देशांतील प्रेक्षकांसाठी प्रयोग सादर करत असतात. अर्थात आपापल्या घरूनच! ‘मोगरा’ नाटकाची संपूर्ण टीम महाराष्ट्राच्या विविध भागांत इतक्या ठिकाणी विखुरलेली आहे, की हा प्रयोग निर्विघ्नपणे कसा काय पार पडतो याचंच आश्चर्य वाटावं. अर्थात ही पाच वेगवेगळ्या स्त्रियांची प्रत्येकीची स्वतंत्र गोष्ट असल्याने नाटकाच्या एकजिनसी प्रयोगाचं ओझं ‘मोगरा’ नाटकावर नाहीए. मात्र, परस्परांमध्ये गुंतलेल्या नात्यांचं वा समस्येवरचं, बहुविध आशयसूत्रं असलेलं आणि अनेक पात्रं असलेलं एखादं नाटक नेपथ्यादी सर्व तांत्रिक बाबी उत्तमरीत्या साकारत सादर करायचं तर ते थिएटरमध्येच करावं लागणार. त्याखेरीज पर्याय नाही. जे ‘स्नॅपशॉट्स..’ नाटकात असणार आहे. त्या अर्थी हा प्रयोग ‘मोगरा’च्या एक पाऊल पुढे जाणारा असेल. करोनाकाळातच नव्हे तर यापुढच्या काळात एकाच वेळी चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनासारखाच नाटय़प्रयोगाचा हा नवा ट्रेण्ड खूप शक्यतांचा असेल. त्याकरता येणाऱ्या निरनिराळ्या मर्यादांवर सादरकर्त्यांना मात करावी लागेल. त्यासाठी लागणारी अत्याधुनिक तांत्रिक कौशल्यं विकसित करावी लागतील. जी यथावकाश विकसित होतीलही. विज्ञान-तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित होत आहे ते पाहता ही आकांक्षा पूर्ण व्हायला काहीच हरकत नाही.

या व्हच्र्युअल नाटय़प्रयोगांमुळे सर्वात मोठा फायदा हा होईल की, आज परदेशात नाटक घेऊन जाण्यासाठी जे प्रचंड सायास करावे लागतात ते टळतील. विशेषत: आर्थिक बाबतीत हा ‘प्रयोग’ सर्वानाच (परदेशी प्रेक्षक तसेच नाटय़कर्मी दोघांनाही!) परवडणारा असेल. परदेशात प्रयोग करण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या प्रयोग परवानग्या, व्हिसाची किचकट प्रक्रिया, जाण्यायेण्याचा प्रचंड खर्च, तिथला वास्तव्याचा खर्च, त्याचबरोबर परदेशात तिथल्या प्रेक्षकांच्या सोयीनेच प्रयोग सादर करावे लागत असल्याने फक्त शनिवार-रविवारीच प्रयोग करावे लागणं- या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसवावा लागतो. शिवाय तिथली अत्याधुनिक नाटय़गृहं भाडय़ाच्या दृष्टीने आपल्याला परवडणारी नसल्याने शाळा-चर्च वगैरेंची प्रेक्षागृहं नाटय़प्रयोगासाठी घ्यावी लागतात. त्यांच्या नियम व अटींची पूर्तता करणंही खूपच जिकिरीचं असतं. शिवाय तिथल्या सोयीसुविधांशी आपल्या नाटकाच्या तांत्रिक गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात, त्या वेगळ्याच. असे अनेक सव्यापसव्य परदेशांत प्रयोग करताना करावे लागतात. बरं, आठवडय़ातील उर्वरित दिवसांत प्रयोग नसल्याने कलावंतांचा सर्व खर्च निर्मात्याला करावा लागत असल्याने त्याला मोठाच भुर्दंड पडतो. हे सारंच या आगळ्यावेगळ्या व्हच्र्युअल प्रयोगांमुळे वाचणार आहे.

आणखीही एक गोष्ट हल्ली जाणवायला लागली आहे. ती म्हणजे परदेशात नाटकाचे प्रयोग करायला जायचं म्हणजे कलाकारांना इथल्या सिनेमा, मालिका, भरघोस आर्थिक लाभ देणाऱ्या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या वगैरेवर पूर्णपणे पाणी सोडावं लागतं. त्या प्रमाणात परदेशातील प्रयोगांतून फार मिळकत होते असं नाही. परदेशात जाऊन आल्याचं समाधान हीच काय ती जमेची बाजू. परंतु आता परदेशवारीचं अप्रूपही कलाकारांना फारसं उरलेलं नाही. आज ते स्वत: खर्च करून परदेशांत फिरून येऊ शकतात. त्यातही अनेकांचं आजवर नाटय़प्रयोगांच्या निमित्ताने बहुतेक जगपर्यटन झालेलं आहे. त्यामुळे त्याचंही आकर्षण कलाकारांना आज राहिलेलं नाही. त्यामुळे इथलं आर्थिक नुकसान सोसून परदेशात केवळ चार-आठ प्रयोगांसाठी जाणं आता त्यांना नकोसं वाटतं. त्याचबरोबर परदेशातील नाटय़रसिकांनाही भारतातून एखाद्या नाटकाला प्रयोगाकरता तिथं बोलावणं खूप खर्चीक असतं. त्यामुळे नाटक पाहण्याची कितीही तीव्र इच्छा असली तरी त्यामागचं अर्थकारण परवडत नसल्याने त्यांचीही अडचण होते. त्यांच्यापैकी कित्येक जण म्हणूनच भारतात आल्यावर बरीच नाटकं पाहतात आणि आपली ही सांस्कृतिक भूक भागवतात. व्हच्र्युअल नाटय़प्रयोगामुळे या अभावग्रस्ततेवर आता नामी उपाय सापडलेला आहे. त्यामुळे प्रेक्षक आणि नाटय़कर्मी अशा सगळ्यांचंच अर्थकारण भौगोलिक, आर्थिक अडचणी उल्लंघून किफायतशीरपणे होऊ शकेल आणि देश-परदेशांतील रसिकांना नाटकं बघण्याची संधी व्हच्र्युअल नाटकांमुळे उपलब्ध होईल.

अर्थात नाटक ही जिवंत कला असल्याने नाटकाच्या प्रत्यक्ष प्रयोगाची खुमारी काही औरच असते. ती घ्यायला रसिक नाटय़गृहाकडे वळतीलच.