रेश्मा राईकवार

‘गँग्ज ऑफ वासेपूर’मध्ये मी एका छोटय़ा भूमिकेत होतो. तुम्हाला शोधावं लागेल मला त्यात.. कालीन भैय्या म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता पंकज त्रिपाठीचे हे बोल. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याआधी आणि त्यानंतरही अभिनेता पंकज त्रिपाठीचा चेहरा ‘फुकरे’, ‘फुकरे रिटर्न्‍स’, ‘दिलवाले’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’.. अशा किती तरी चांगल्या चित्रपटांमधून आणि लक्षात राहण्याजोग्या भूमिकांमधून झळकला. आणि तरीही २०१८ साली अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या ‘मिर्झापूर’ या वेबमालिके तील त्यांच्या कालीन भैय्याने जगभर जो दंगा केला त्याला तोड नाही. या एका वेबमालिकेने पंकज त्रिपाठी या अभिनेत्याची मोठय़ा प्रमाणावर दखल घ्यायला लावली. या वर्षांखेरीस ५० कोटींचा प्रेक्षकवर्ग देशभरातील ओटीटी प्लॅटफॉम्र्सनी कमावलेला असेल. केवळ देशात इतक्या मोठय़ा प्रमाणात पाहिल्या जाणाऱ्या या ओटीटी माध्यमांवरील वेबमालिका आणि वेबपटांनी गेल्या दोन-तीन वर्षांत अशा अनेक नव्या गुणवान चेहऱ्यांना प्रेक्षकांच्या मनात एक ओळख मिळवून दिली आहे. ओटीटी प्लॅटफॉम्र्स नसते तर यांच्यापैकी बहुतांश चेहरे हे बॉलीवूडच्या तथाकथित ग्लॅमर आणि सुपरहिट्सच्या प्रवाहात कुठल्या कुठे हरवले असते..

गेल्या पाच वर्षांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, डिस्ने हॉटस्टार, झी ५, अल्ट बालाजी, एमएक्स प्लेअर अशा वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉम्र्सनी आपले पाय भक्कम रोवले आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात टीव्हीएफवर प्रदर्शित झालेल्या ‘ट्रिपलिंग’, ‘परमनन्ट रुममेट्स’सारख्या वेबमालिकांमधून लोकप्रिय झालेले सुमीत व्यास, अमोल पराशर अशी दोन-तीन नावं होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांनी छोटय़ा पडद्यावरही प्रवेश केला असला तरी ओटीटीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र नवनवीन आशय, मांडणीचे स्वातंत्र्य, प्रसिद्ध कलाकारांचाच चेहरा पाहिजे असा कोणताही सोस नसलेल्या या माध्यमांवर मिळणारे स्वातंत्र्य यामुळे वेबमालिकांमधून नवनवे प्रयोग होत राहिले. हिंदी चित्रपटांच्या साचेबद्ध मांडणीला कंटाळलेला एक मोठा प्रेक्षकवर्ग हातातल्या मोबाइलवर खुल्या झालेल्या या मनोरंजनविश्वाकडे खेचला गेला. एका क्लिकवर आपलं काम जगभरात पोहोचतं आहे, याची जाणीव कलाकारांसह दिग्दर्शक-निर्माते सगळ्यांनाच झाली. आणि वाढत गेलेल्या या ओटीटीच्या बाजारपेठेतील वेबमालिकांच्या निर्मितीचा आकडा आणि त्यातून येणाऱ्या नव्या कलाकारांचा टक्काही वाढत गेला आहे.

करोनामुळे टाळेबंदी जाहीर होण्याआधी आयुषमान खुराणा आणि जितेंद्र कुमार या जोडीचा ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात आयुषमान आणि जितेंद्रची जोडी चांगलीच गाजली, मात्र जितेंद्र कु मारचा चेहरा याआधीच लोकांना परिचित झाला होता. टीव्हीएफच्या ‘परमनन्ट रुममेट्स’नंतर ‘कोटा फॅक्टरी’ या वेबमालिकेतही तो झळकला होता. सध्या अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘पंचायत’ ही त्याची वेबमालिकाही लोकांच्या पसंतीस उतरली आहे. जितेंद्रप्रमाणेच सध्या एकाच वेळी चित्रपट आणि वेबमालिकांमधून लक्ष वेधून घेणारा आणखी एक कलाकार आहे तो म्हणजे अभिषेक बॅनर्जी. अभिषेकने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात कास्टिंग डिरेक्टर म्हणून केली होती. ‘द डर्टी पिक्चर’, ‘नो वन किल्ड जेसिका’पासून ते ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘कलंक’सारख्या चित्रपट आणि वेबमालिकांचे कास्टिंग करणाऱ्या अभिषेक आणि त्याचा मित्र अनमोल अहुजा ही जोडी कास्टिंग डिरेक्टर म्हणून लोकप्रिय आहे. ‘कास्टिंग बे’ नावाने कंपनी चालवणारा अभिषेकही अनेक छोटय़ा-मोठय़ा हिंदी चित्रपटांतून झळकला आहे. ‘स्त्री’ चित्रपटात जनाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अभिषेकनेही ‘मिर्झापूर’, ‘टाईपरायटर’ आणि ‘पातळलोक’ या वेबमालिकेतून काम केलं आहे. ‘पाताळलोक’मध्ये त्याने हथोडा त्यागी नामक साकारलेली खुन्याची भूमिका रसिकांची दाद मिळवून गेली आहे. याच वेबमालिकेतून आणखी एक नावारूपाला आलेला चेहरा आहे तो अभिनेता जयदीप अहलावतचा. ‘कमांडो’ चित्रपटात नायक विद्युत जामवालसमोर संकटांची मालिका उभा करणारा अतिदुष्ट खलनायक म्हणून लक्षात राहिलेल्या जयदीपने त्यांनतर हिंदी चित्रपटांमध्ये अशाच छोटय़ा-मोठय़ा भूमिका केल्या, मात्र ‘बार्ड ऑफ ब्लड’ या नेटफ्लिक्सवरील वेबमालिकेनंतर ‘पाताळलोक’मधून त्याच्यातील कसदार अभिनेता लोकांना अनुभवायला मिळाला. याच वेबमालिकेतील इश्वाक सिंग या अभिनेत्याचेही काम अनेकांना आवडले. प्राइमवरील ‘मेड इन हेवन’ या झोया अख्तर दिग्दर्शित वेबमालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता शशांक अरोरा सलमानबरोबर ‘भारत’ या चित्रपटात त्याच्या भावाच्या भूमिकेत चमकला. अभिनायबरोबरच संगीतकार आणि पटकथाकार म्हणून शशांक प्रसिद्ध आहे.

वेबमालिकांतील कलाकार वेगळे आणि हिंदी चित्रपटांतले कलाकार वेगळे असा विचारच आता राहिलेला नाही, असे गेल्या काही वर्षांत सातत्याने वेबमालिकांमधून प्राधान्याने काम करणाऱ्या अभिनेत्री रसिका दुगलने स्पष्ट केले. नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘अ सुटेबल बॉय’मध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एफटीआयआयमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या रसिकाने ‘परमनन्ट रुममेटपासून’ वेबमालिकांमध्ये काम केले आहे. गेल्या दोन वर्षांत प्रदर्शित झालेल्या रसिकाच्या ‘मिर्झापूर’, ‘मेड इन हेवन’, ‘दिल्ली क्राईम’, ‘आऊट ऑफ लव्ह’ या चारही वेबमालिका यशस्वी ठरल्या आहेत. रसिकाने हिंदी चित्रपटांमधूनही काम केले आहे, मात्र वेबमालिकांमध्ये काम करताना कलाकारांना अधिक वाव मिळतो. तीन तासांच्या चित्रपटात कापल्या जाणाऱ्या भूमिका आणि मिळणाऱ्या मर्यादित संधींच्या तुलनेत वेबमालिकांमध्ये छोटी व्यक्तिरेखा असली तरी त्याला पुरेसा वाव मिळतो. तुमचा चेहरा आणि तुमचे काम जगभरात पोहोचते, हे जास्त महत्त्वाचे असल्याचे रसिका स्पष्ट करते. नेटफ्लिक्सच्या ‘लिटिल थिंग्ज’मधून झळकलेल्या अभिनेत्री मिथिला पालकरनेही ‘ऑफिशिअल चुकियागिरी’, ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘गर्ल इन द सिटी २’सारख्या वेबमालिकांमधून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. नायिकेसाठीच्या तथाकथित चौकटीत न बसणारी आणि तरीही आपल्या अभिनयाने ‘मेड इन हेवन’, ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मानवी गगरू ही सध्या चित्रपटांमधूनही वेगळ्या भूमिका साकारताना दिसते आहे. ‘मेड इन हेवन’, ‘बार्ड ऑफ ब्लड’, ‘घोस्ट स्टोरीज’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेली सोबिता धूलिपाल, ‘मिर्झापूर’ची श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर यांच्यासह अनेक नवनवीन अभिनेत्री वेबमालिका आणि वेबपटांमधून नानाविध भूमिकांमधून लक्ष वेधून घेत आहेत. वेबमालिकांमधून मिळणारं अभिनयाचं समाधान आणि याच माध्यमातून हिंदीतील नावाजलेल्या दिग्दर्शकांसह जगभरातील प्रेक्षकांमध्ये निर्माण होणारी ओळख याच्या जोरावर चित्रपट, ओटीटी, जाहिराती अशा वेगवेगळ्या माध्यमांतून काम मिळवणं या कलाकारांना शक्य झालं आहे. ओटीटी माध्यमांवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे अनेक प्रतिभावंत दिग्दर्शक, निर्माते वेबमालिकांच्या निर्मितीत उतरले आहे. शाहरूख खान, अनुष्का शर्मासारखे मोठे कलाकार वेबमालिकांची निर्मिती करत आहेत. तर हंसल मेहता, निखिल अडवाणी, अलंक्रिता श्रीवास्तव, अभिषेक कपूर, झोया अख्तर अशी आजवर हिंदी चित्रपट दिग्दर्शनातच रमलेली मंडळीही वेबमालिकांच्या दिग्दर्शनात उतरले आहेत. ओटीटी माध्यमांवरील स्पर्धा जशी तीव्र होते आहे, तसतसा दर्जेदार आशयनिर्मितीची मागणी आणि आकडाही वाढत चालला आहे. ही एकप्रकारे या नवोदित कलाकारांसाठी पर्वणी ठरली असून येत्या काही दिवसांत असे आणखी नवे चेहरे प्रेक्षकांसमोर येतील, यात शंका नाही.

‘गँग्ज ऑफ वासेपूर’मध्ये मी एका छोटय़ा भूमिकेत होतो. तुम्हाला शोधावं लागेल मला त्यात.. कालीन भैय्या म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता पंकज त्रिपाठीचे हे विधान. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याआधी आणि त्यानंतरही अभिनेता पंकज त्रिपाठीचा चेहरा ‘फुकरे’, ‘फुकरे रिटर्न्‍स’, ‘दिलवाले’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’.. अशा किती तरी चांगल्या चित्रपटांमधून आणि लक्षात राहण्याजोग्या भूमिकांमधून झळकला. आणि तरीही २०१८ साली अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या ‘मिर्झापूर’ या वेबमालिके तील त्यांच्या कालीन भैय्याने जगभर जो दंगा केला त्याला तोड नाही. या एका वेबमालिकेने पंकज त्रिपाठी या अभिनेत्याची मोठय़ा प्रमाणावर दखल घेतली गेली. या वर्षांखेरीस ५० कोटींचा प्रेक्षकवर्ग देशभरातील ओटीटी प्लॅटफॉम्र्सनी व्यापला असेल. केवळ देशात इतक्या मोठय़ा प्रमाणात पाहिल्या जाणाऱ्या या ओटीटी माध्यमांवरील वेबमालिका आणि वेबपटांनी गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक नव्या गुणवान चेहऱ्यांना प्रेक्षकांच्या मनात एक ओळख मिळवून दिली आहे. ओटीटी प्लॅटफॉम्र्स नसते तर यांच्यापैकी बहुतांश चेहरे हे बॉलीवूडच्या पारंपरिक ग्लॅमर आणि सुपरहिट्सच्या प्रवाहात कुठल्या कुठे हरवले असते..