राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरयाणा या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर असलेल्या बंदीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट देशातील सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनावर चार राज्यांमध्ये असलेल्या बंदीविरोधात निर्मात्यांनी याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुरुवारी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सर्व राज्यांची आहे आणि चित्रपट स्क्रिनिंगदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. चित्रपटात नावापासून अनेक बदल करण्यात आलेले असून परीनिरीक्षण मंडळाने सुचवेलेले बदलही केले आहेत. यानंतरही राज्य सरकारांना या चित्रपटावर बंदी घालण्याचा अधिकार कसा काय असू शकतो, असा सवाल करण्यात निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला होता.

राजपूत संस्कृतीचा अवमान आणि राणी पद्मावतीची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाला सुरुवातीपासूनच करणी सेनेकडून विरोध करण्यात येत होता. अखेर या सर्व वादांनतर सेन्सॉ़र बोर्डाने मध्यस्ती करत या चित्रपटात पाच बदल सुचवले. सोबतच चित्रपटाच्या नावात बदल करत त्याला यू/ए प्रमाणपत्राने प्रमाणित करण्यात आले. पण, तरीही चित्रपटाविषयी करणी सेनेची नाराजी मात्र काही केल्या दूर झालेली नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास ‘जनता कर्फ्यू’ लावू असा इशाराही करणी सेनेने दिला होता. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वाटेतील अडथळे दूर झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.