ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरेच्या अभिनयाने सजलेल्या ‘प्रेम रोग’ चित्रपटाने ऐंशीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटातील गाणी आज देखील अनेकांच्या ओठांवर ऐकायला मिळतात. ऋषी कपूर यांचे वडिल म्हणजेच राज कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी पद्मिनी कोल्हापुरे एका दृश्यामध्ये ऋषी कपूर यांच्या कानशिलात लगावताना दिसली होती. चित्रपटातील या दृश्यामध्ये वास्तवता आणण्यासाठी पद्मिनीने ऋषी कपूर यांना खरोखरच जोरात कानशिलात मारावी, अशी राज कपूर यांची इच्छा होती. मात्र चित्रपटसृष्टीत नवख्या असल्यामुळे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेला दिग्दर्शकाच्या या सूचना सत्यात आणणे फारच जड जात होते.

या चित्रपटावेळी पद्मिनी कोल्हापूरे बॉलिवूडमध्ये फारशी परिचित नव्हती. मात्र ऋषी कपूर यांनी स्वत:ची एक ओळख निर्माण केली होती. त्यामुळे नवख्या अभिनेत्रीने सर्वांसमोर कानशिलात लगावणे त्यांना देखील खटकत होते. मात्र, राज कपूर यांना नकार देण्याचे धाडस ऋषी करु शकत नव्हते. अर्थातच पद्मिनी कोल्हापूरेची घुसमट आणि ऋषी कपूर यांच्या नाराजीतच चित्रपटातील कानशिलात लगावण्याचा प्रसंग चित्रीत करण्यात आला होता. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ऋषी कपूर नक्कीच तो क्षण विसरले असतील. या चित्रपटामध्ये ऋषी कपूर यांनी श्रीमंत विधवा महिलेच्या प्रेमात पडलेल्या एका व्यक्तिची भूमिका साकारली होती.  या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे ‘खुल्लमखुल्ला’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले होते. त्याच्या या पुस्तकातून बॉलिवूडमधील अनेक घटनांचा खुलासा समोर आला होता. या पुस्तकातून बॉलिवूडमधील अनेक घटना समोर आल्याचे पाहायला मिळाले होते. हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून ऋषी कपूर चांगलेच चर्चेत आहेत. पुस्तक प्रकाशनानंतर त्यातून संजय दत्त आणि ऋषी कपूर यांच्यातील वाद टोकाला गेल्याचेही समोर आले होते. बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या गुलशन ग्रोवर याने संजय दत्त आणि ऋषी कपूर यांच्या वादावर भाष्य केल्यानंतरही ते चर्चेत आले होते. टीना मुनीमसोबतच्या प्रेम प्रकरणादरम्यान संजय दत्तच्या मनात ऋषी कपूर यांच्याबद्दल राग निर्माण झाल्याची घटना गुलशन ग्रोवरने डिएनएला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. तेव्हा ऋषी कपूर टीनाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संजय दत्तला वाटत असल्यामुळे संजू बाबाने टोकाचा विचार केला होता, असे ग्रोवर यावेळी म्हणाला होता.