18 September 2019

News Flash

पाकिस्तानच्या लष्कर प्रवक्त्यांचा शाहरुख खानला अजब सल्ला

मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ‘बार्ड ऑफ ब्लड’च्या ट्रेलरवर ताशेरे ओढले आहेत

शाहरुख खान

नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्यानंतर आता वेब सीरिजचा काळ आला आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सारेच वेब सीरिजच्या विश्वात रमत असून ते या सीरिजच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. अभिनेता शाहरुख खानच्या रेडचिलीज् निर्मिती ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही नवी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसापूर्वी त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र हा ट्रेलर पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांना फारसा काही रुचलेला दिसत नाही. त्यामुळेच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेलरवर ताशेरे ओढत शाहरुखला एक सल्ला दिला आहे.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ‘बार्ड ऑफ ब्लड’ या सीरिजच्या ट्रेलरवर भाष्य करत शाहरुखला एक विचित्र सल्ला दिला आहे. “शाहरुखला भारत अधिकृत काश्मीरमध्ये जो अत्याचार सुरु आहे, त्या विरुद्ध आवाज उठवायला हवा. शाहरुख तुम्हाला बॉलिवूड सिंड्रोम आहे. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी रॉ एजंट कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि २७ फेब्रुवारी २०१९ या साऱ्यावर नजर फिरवा. तुम्हाला भारत अधिकृत काश्मीरमधील अत्याचाराविरुद्ध बोलायलाच हवं. तसंच नाझीवादाने प्रेरित झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदूत्वाच्या मुद्द्याविरोधातही बोलायला हवे. तरचं तुम्ही शांतता आणि मानवता यांना प्रोत्साहन देऊ शकता”, असं आसिफ गफूर यांनी म्हटलं आहे.

वाचा : Bigg Boss Marathi 2 : पराग कान्हेरेचा घरातील ‘या’ सदस्याला पाठिंबा

दरम्यान, ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही सीरिज लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे. या सीरिजमध्ये अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजमध्ये इम्रानने कबीर या गुप्तहेराची व्यक्तीरेखा साकारली आहे. ही सीरिज २७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

First Published on August 25, 2019 11:14 am

Web Title: pakistan army spokesman major general asif ghafoor tweet against bollywood actor shahrukh khan ssj 93