आपल्या लेखणीतून अद्वितीय कथा साकारणारे सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी पाकिस्तानमधील सेट अहमदाबादमध्ये साकारण्यात आला. यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मंटो यांची भूमिका साकारणार आहे.
चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदित दास यांना काही भाग पाकिस्तानमध्ये चित्रीत करायचा होता. १९४० चा काळ त्यांना लाहोरमध्ये चित्रीत करायचा होता. मात्र उरी हल्ल्यामुळे तिथलं शूटिंग रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. आता पाकिस्तानचा सेट अहमदाबादमध्ये उभारण्यात आला आहे. या चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीची आणि स्वातंत्र्यानंतरची कथा दाखवण्यात आली आहे.
अहमदाबादमध्ये पाकिस्तानसारखं सेट साकारण्याची जबाबदारी कलादिग्दर्शिका रिटा घोषने घेतली. ऐतिहासिक काळ दाखवण्यासाठी सेटची गरज होती. त्यासाठी वास्तविक ठिकाण हवे होते. चंदीगढ, लुधियाना आणि अहमदाबादमधील ठिकाणांची तिने पाहणी केली आणि अखेर अहमदाबादमध्ये लाहोरचा सेट साकारला. हा सेट उभारण्यासाठी संपूर्ण टीमला खूप मेहनत घ्यावी लागली.
नंदिता दास दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीनसोबतच रसिका दुग्गल, ताहिर राज भसीन, दिव्या दत्ता आणि ऋषी कपूर यांच्याही भूमिका आहेत. २१ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 12:50 pm