दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट अडचणीत असल्याचं म्हटलं जात होतं. चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफरने मध्येच काम सोडल्यामुळे शूटिंगमध्ये अडथळा निर्माण झाल्याची चर्चा होती. या सर्व चर्चांवर आता स्वत: गोवारिकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चित्रपट अडचणीत आल्याच्या केवळ अफवा असून त्यात काही तथ्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

सिनेमॅटोग्राफर किरण देवहंस यांनी मध्येच काम सोडलं अशी चर्चा होती. याविषयी ट्विट करत गोवारिकर यांनी म्हटलं की, ‘किरण देवहंस यांना पानिपतसाठी कधी विचारात घेतलंच नव्हतं. छायादिग्दर्शक म्हणून सी.के. मुरलीधरन यांची निवड करण्यात आली आहे. शूटिंगची सर्व तयारी जोमाने सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये शूटिंगला सुरुवात होणार असून मी फार उत्सुक आहे.’

वाचा : जेव्हा मुलगीच अनिल कपूरची खिल्ली उडवते..

पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सनॉन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. कर्जत इथल्या एनडी स्टुडिओत शनिवारवाड्याची प्रतिकृतीदेखील उभारण्यात येत आहे. ६ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ऐतिहासिक कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.