‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे ट्रेलर सध्या बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. बिंदू आणि अभीची धमाल गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या यशराज फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत या प्रेमकहाणीचे विविध चॅप्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणले जात आहेत. त्यापैकीच चॅप्टर ४ नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या नव्या चॅप्टरमध्ये बिंदू आणि अभिमन्यूची आई या दोघींचा आमनासामना झाल्याचे पाहायला मिळत आहे.
‘मेरी प्यारी बिंदू’चा नवा ट्रेलर पाहता बिंदू आणि अभी एकमेकांचे शेजारी असल्याचे लक्षात येत आहे. त्यासोबतच या ट्रेलरमध्ये काही धमाल किस्से आणि अभीच्या आईसमोर बिंदू उभं करत असलेली त्याचं चित्र या साऱ्याची सुरेख सांगड घालण्यात आली आहे. ‘आम्ही पहिल्यांदा डान्स बार मध्ये भेटलो होतो’, असं जेव्हा बिंदू अभीच्या आईला सांगते त्यावेळी आईच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे आहेत. एखाद्या आईला जेव्हा आपला मुलगा डान्सबारमध्ये जातो असे कळल्यावर जे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसतात अगदी तसेच भाव अभीच्या आईच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत.
‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे आतापर्यंत प्रदर्शित झालेले ट्रेलर पाहता परिणीती (बिंदू) आणि आयुषमान खुराना (अभिमन्यू) यांची अफलातून केमिस्ट्री, त्यातून होणारी विनोदनिर्मिती या सर्व घटकांच्या आधारावर चित्रपटाचे कथानक पुढे जाणार आहे. रेट्रो थीम या चित्रपटातील एक मुख्य भाग आहे. त्यामुळे रेट्रो गाणी, त्या काळचे राहणीमान या साऱ्याचा मेळ दिग्दर्शक ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात घालण्यात आला आहे. यशराज बॅनर अंतर्गत बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्माने केली आहे. प्रेमाचा एक वेगळा प्रवास सांगणारा हा चित्रपट १२ मे २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 4:16 pm