परिणीतीची लाडकी बहिण ‘मीमी दीदी’ उर्फ प्रियांका चोप्रा आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रियांकानं इन्स्टाग्रामवर आपल्या साखरपुड्यातील फोटो शेअर करून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अधिकृत दुजोरा दिला. मुंबईत रोका विधी पार पडल्यानंतर परिणीतीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रियांका- निकसाठी एक संदेश लिहिला आहे. प्रियांकासोबतचा फोटो शेअर करुन तिनं आपल्या लाडक्या ‘मीमी दीदी’ सोबतच्या प्रेमळ नात्याचा उलगडा केला आहे.

प्रियांका भारतीय पद्धतीनं लग्न करणार अशी चर्चा आहे. मात्र निक अमेरिकन आहे, तेव्हा त्याच्यासाठी भारतीय लग्नातल्या सगळ्याच विधी नवीनच असणार हे नक्की. तेव्हा ‘जूता छुपाई’मध्ये तू निकच्या चपला लपवणार का असा प्रश्न तिला चाहत्यांनी विचारला यावर तिनं मोठं मजेशीर उत्तर दिलं आहे. लग्नमंडपात नवऱ्यामुलीच्या बहिणी नवरदेवाच्या नवीन चपला लपवतात आणि त्याबदल्यात नवरदेवाकडे पैसे किंवा इतर भेटवस्तूची मागणी करतात. त्यामुळे तू निकसोबत असं करणार का या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, मी नक्कीच त्याच्या चपला लपवणार आहे आणि त्याच्याकडून काय मागायचं हे मी ठरवलं आहे यावर माझं बोलणं सुरू आहे असं उत्तर तिनं दिलं आहे.

निक हा आपल्या बहिणीसाठी सर्वतोपरी उत्तम आणि साजेसा मुलागा असल्याचं म्हणत आता यापुढे त्याने प्रियांकाची काळजी घ्यावी अशी विनंतीही त्याला केली आहे.