‘झीरो’ या चित्रपटानंतर अभिनेता शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो ‘पठाण’ या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे सध्या शाहरुख आणि त्याच्या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. यामध्येच ‘पठाण’च्या सेटवर वादविवाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या असिस्टंट डायरेक्टरने चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या कानशिलात लगावल्याचं ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तात म्हटलं आहे. ‘पठाण’च्या सेटवर एका क्षुल्लक कारणावरुन सिद्धार्थ आनंद आणि सहाय्यक दिग्दर्शकामध्ये वाद झाला. या शाब्दिक वादाचं रुपांतर हाणामारीपर्यंत गेल्याचं सांगण्यात येत आहे.
सिद्धार्थ आनंद कामाच्या बाबतीत प्रचंड शिस्तबद्ध असून त्यांना चित्रीकरणादरम्यान कोणताही अडथळा सहन होत नाही. त्यामुळे सेटवर त्यांनी मोबाईल फोन आणण्यासदेखील सक्त मनाई केली आहे. याच मुद्द्यावरुन सिद्धार्थ आणि सहाय्यक दिग्दर्शकामध्ये वाद झाला. या वादात सिद्धार्थने या सहाय्यक दिग्दर्शकाला फटकारलं. त्यानंतर रागाच्या भरात या सहाय्यक दिग्दर्शकाने सिद्धार्थसह सेटवरील काही लोकांना शिवीगाळ केला. ही माहिती सिद्धार्थला समजल्यानंतर त्याने या सहाय्यक दिग्दर्शकाला जाब विचारला. मात्र, त्याचवेळी त्यांचा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला आणि या सहाय्यक दिग्दर्शकाने सिद्धार्थच्या कानशिलात लगावली.
दरम्यान, प्रथम सिद्धार्थने हात उगारल्यामुळे या सहाय्यक दिग्दर्शकाने सिद्धार्थला त्याच्याच भाषेत म्हणजे कानशिलात लगावत उत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. या वादानंतर आता चित्रीकरणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 5:37 pm