बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोष हिने ‘वाय श्रेणी’तील सुरक्षेची मागणी केली आहे. अनुराग विरोधात पोलीस तक्रार केल्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्यांमुळे तिच्या जीवाला धोका आहे. परिणामी सरकारने पायलला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा द्यावी, अशी मागणी तिचे वकिल नितिन सातपुते यांनी केली आहे. ही सुरक्षा मिळवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना एक विनंती अर्ज देखील लिहिला आहे.

अवश्य पाहा – VIDEO: संतापलेल्या अभिनेत्याचं शक्ती प्रदर्शन; हातांनीच केले लोखंडी गेटचे दोन तुकडे

अवश्य पाहा – महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल

यापूर्वी मोदी सरकारने अभिनेत्री कंगना रणौतला Y+ श्रेणीतील सुरक्षा दिली होती. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत तिचे शाब्दिक द्वंद्व सुरु होते. या शीतयुद्धामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातायेत असा दावा कंगनाने केला होता. तिचं म्हणणं केंद्राने ऐकलं अन् तिला ही Y+ श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली होती. कंगनानंतर आता पायलने देखील अशा प्रकारच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.