भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी वादग्रस्त ट्विट केल्या प्रकरणी अटक झालेल्या अभिनेत्री पायल रोहतगीला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजुर करण्यात आला आहे. पायलला १५ डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती.

काय होते प्रकरण?

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या पायल रोहतगीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी वादग्रस्त विधानं केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. याप्रकरणी राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायल रोहतगी विरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयटी कायद्यासह अन्य कलमांखाली तिला अटक करण्यात आली.

पोलिसांनी अटक केल्यानंतर पायल रोहतगीने स्वतःच्या ट्विटरवरून अटक झाल्याची माहिती दिली होती. “राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावरील व्हिडीओच्या प्रकरणात मला अटक केली आहे. हा व्हिडीओ मी गुगलवरून मिळालेल्या माहितीनुसार बनवला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आता मस्करीच झाली आहे,” असं रोहतगीनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. या ट्विटमध्ये तिने गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग केलं होतं.